बाकं बडवणाऱ्यांनीच देश आणि लोकशाही वाचवली; संजय राऊत यांनी राज ठाकरेंना सुनावले

बाकं बडवणारे खासदार हवेत की मोदींच्या मंत्रिमंडळात जाऊन काम करणारे खासदार हवेत, असे विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कोकणात नारायण राणेंसाठी घेतलेल्या सभेत केले. या विधानाचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. बाकं बडवणाऱ्यांनीच देश आणि लोकशाही वाचवली आहे. काल कोकणातील अनेक प्रमुख नेत्यांना राज ठाकरे यांनी अपमान केला. नारायण राणे यांनी मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्र, कोकणासाठी काय दिवे लावले याचा खुलासा त्यांची वकिली करणाऱ्या करावा, अशा शब्दात राऊत यांनी राज ठाकरे यांना सुनावले.

बाकं बडवणारे खासदार म्हणजे काय? मंत्रिडळात गेले नाही म्हणजे बाकं बडवणारे का? असा सवाल करत हा बॅ. नाथ पै यांचा अपमान आहे, असा घणाघात खासदार राऊत यांनी केले. बॅ. नाथ पै हे कोकणातील अत्यंत नामवंत वक्ते आणि खासदार होते. पंडित नेहरू त्यांचे भाषण ऐकायला थांबायचे, हा त्यांचा अपमान आहे. मधु दंडवते कोकणातून निवडून गेले. नंतर मंत्री झाले. असे अनेक खासदार कोकणातून निवडून गेले आणि त्यांनी देशाचे, आपल्या भागाचे प्रश्न मांडले. ते काय फक्त बाकं बडवणारे खासदार होते का? लोचटगिरी करून, दहा पक्षांतरं करून मंत्रीपद भोगणे हा विकास नाही. बाकं बडवणाऱ्यांना हा देश, लोकशाही वाचवली आणि आणि बाकं वाजवून लोकशाही संदर्भात प्रश्न विचारणाऱ्या 140 खासदारांना मोदी-शहांनी निलंबित केले. बी बाकं बडवणाऱ्यांची ताकद आहे, असा टोलाही खासदार संजय राऊत यांनी लगावला.

बॅ. नाथ पै हे कोकणातून निवडून येत होते आणि पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सरकारला आपल्या भाषणाने घाम फोडत होते. पण आता राज ठाकरे यांना राणेंचे समर्थन करणे मजबुरी झाली आहे. बॅ. नाथ पै, मधु दंडवते, सावंत यांनी बाकं बडवली असतील तरी त्यांनी महत्त्वाच्या भूमिका घेतल्या होत्या. बॅ. नाथ पै यांनी बाकं बडवून बेळगाव-कारवार मुंबईसह सीमाभागातील प्रश्न हे संसदेत मांडलेले आहेत. मधू दंडवते यांनी बाकं बडवून कोकण रेल्वे कोकणात आणली, भ्रष्टाचारावर हल्ले केले. थोडे आत्मचिंतन केले तर समजू शकते. पण हे नकली भक्त असून उद्या यांची भक्ती आणि देवही बदलू शकतात, अशा शब्दात खासदार राऊत यांनी राज ठाकरेंचा समाचार घेतला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

महाराष्ट्राचा विध्वंस करणारे, विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे. इथली आमची शेती, मासेमारी, मत्स्य व्यवसाय, फळबागा, आंबा-काजू यांचे नुकसान करायचे आणि त्याला विरोध केल्यावर कोकणात जाऊन आमच्यावर टीका करायची. सध्या मोदी-शहांचे हे जे नवीन भक्त झालेले आहेत ते खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का? याचे त्यांनी आत्मचिंतन करावे, असा सल्लाही राऊत यांनी दिला. तसेच मोदी-शहांनी महाराष्ट्र, मुंबईतील प्रकल्प पळवून नेले त्याच्यावर राणेंनी, राज ठाकरेंनी एकदा तरी तोंड उघडले का? असा सवालही राऊत यांनी केला.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येमध्ये रॅली काढणार आहे. यावरही राऊत यांनी भाष्य केले. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांमध्ये भाजप पिछाडीवर असून आता त्यांचे ‘राम नाम सत्य’ आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आधी तिथे पाठवले आणि आता स्वत: मोदी जात याहेत. द्वारका, मथुरा, अयोध्यत मंदिर, मंदिर फिरतील पण विकासावर बोलणार नाहीत. ‘काम की बात करणार नाहीत. बेरोजगारीवर बोलणार नाहीत. पुलवामा का झाला यावरही बोलणार नाहीत आणि काल दिवसाढवळ्या पुंछ जवानांवर हल्ला झाला, जवान शहीद झाले त्याच्यावरही अयोध्येत बसून बोलणार नाहीत. फक्त रामाच्या नावावर मतं मागतील. पण जनता आता त्यांना मदत करण्याच्या मूडमध्ये नाही, असेही राऊत म्हणाले.