किस्से आणि बरंच काही- तो मी नव्हेच!

 

>>धनंजय साठे

‘भीष्म पितामह’ आणि ‘शक्तिमान’ची भूमिका अजरामर करणारे सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना आणि माझा चेहरा जुळत असल्याचं सतत कानावर पडायला लागलं. खरं तर हे वाक्य ऐकून मला मजा वाटायला लागली होती, पण सतत तो मी नव्हेच हे सांगताना माझी तितकीच धांदलही उडत होती.

मी जेव्हा पाळण्यात होतो तेव्हापासूनच कदाचित मी कोणासारखा दिसतो यावर चर्चा सुरू झाली असावी. मूल झालं की, ते आईवर गेलंय की बाबांवर याच्या पलीकडे अशी कुजबुज पुढे सरकत नसते, पण जसजसं मूल मोठं होत जातं तसतसं त्याचा चेहरा बदलत जातो. माझंही तसंच काहीसं घडत गेलं. कॉलेजमध्ये मी स्वतला अमिताभ बच्चनच समजायचो. केशरचनेपासून बसणं, चालणं, बोलणं प्रतिबच्चन! निदान माझा तरी हा गोड गैरसमज होता, पण जसजसं वयाने वाढत गेलो आणि पुढे मालिका व चित्रपट क्षेत्रात पदार्पण केलं तेव्हा एका वेगळ्याच नावाच्या व्यक्तीबरोबर माझा चेहरा जुळत असल्याचं सतत कानावर पडायला लागलं. ती व्यक्ती होती ‘भीष्म पितामह’ आणि ‘शक्तिमान’ची भूमिका अजरामर करणारे सुप्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना!

“अहो, तुम्ही सेम शक्तिमानसारखे दिसता हो,’’ हे वाक्य ऐकून मला मजा वाटायला लागली होती. अगदी वडापाव विकणाऱया गाडीवाल्यापासून ते लोकल ट्रेनमध्ये सलग तीन दिवस माझ्या बाजूला उभं राहून एकटक माझ्याकडे प्रश्नार्थक चेहऱयाने पाहणाऱया सहप्रवाशापर्यंत. त्या बिचाऱयाला असा प्रश्न पडला होता की, मुकेश खन्ना रोज लोकलने प्रवास करतो? त्या दिवशी मी आणि तो माणूस सीएसटी स्टेशनवर उतरून खूप हसलो होतो.

याहीपेक्षा भन्नाट अनुभव होता, जेव्हा मी माझ्या चित्रपटाच्या दिग्दर्शक व टीमसोबत रेकी करायला सासवडला गेलो होतो तेव्हा. ‘बंध नायलॉन’चे या चित्रपटाचं चित्रीकरण आम्हाला सासवडला करायचं होतं. तेव्हा पुण्याच्या एका मित्राला कॉल करून सासवडच्या चित्रीकरणाची जबाबदारी त्याने घ्यावी असं सांगितलं. तो तेव्हा आकुर्डीला शूट करत होता. त्याने आम्हाला मुंबईला परतताना आकुर्डीमार्गे येऊन गोष्टी फायनल करायला सांगितल्या. संध्याकाळी आम्ही त्याच्या शूटच्या ठिकाणी पोहोचलो. आकुर्डीच्या एका सोसायटीत एक फ्लॅट भाडय़ाने घेऊन त्याचं शूट चालू होतं.

त्या सोसायटीत प्रवेश केला. ड्रायव्हर गाडीतच बसून होता. आम्ही आत गेलो तर अचानक तिथे बसलेली काही युनिटची मंडळी तडकाफडकी उठून उभी राहिली आणि माझ्याकडे आली. एका माणसाने मला विचारलं की, “सर, तुम्ही इथे कसे काय?’’ मला येणाऱया प्रसंगांची काहीच कल्पना नव्हती. त्या माणसाला माझ्या मित्राचं नाव देऊन मला त्याला भेटायचंय असं सांगितलं. अचानक आणखी काही लोक जमा झाले आणि मला म्हणाले की, “सर, तुम्ही इथे थांबू नका,’’ आणि आम्हाला पहिल्या मजल्यावर सोसायटीच्या सेक्रेटरीच्या घरी घेऊन गेले. मला काही कळायच्या आत तिथे पन्नास-साठजणांची गर्दी जमा झाली आणि माझ्या सोबत सेल्फी काढायला लागले. सेक्रेटरी, त्यांची पत्नी आणि मुलगा तर खूपच खुश झाले होते. कारण त्या सगळ्यांना मी मुकेश खन्ना आहे असंच वाटलं होतं. ते सेक्रेटरी तर त्यांच्या कॉलेजच्या दिवसांत त्यांचं कुटुंब कसं ‘महाभारत’ बघायचं याबद्दल सांगू लागले. तेवढय़ात माझा मित्र तिथे आला आणि एकूण प्रसंग पाहून त्याला हसू आवरेना. सेक्रेटरीच्या मुलाने मी त्याच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढावा अशी विनंती केली. चालू शूटमधून त्या चित्रपटाची नायिका आली आणि माझ्याबरोबर फोटो काढून घेतला. बरं, या सगळ्या सेल्फी गोंधळात माझी केविलवाणी “अहो, तो मी नाही हो…’’ अशी आर्जवं कोणी ऐकतच नव्हतं. शेवटी माझ्या मित्राने मध्यस्थी केली. माझं ड्रायव्हिंग लायसेन्स दाखवलं तेव्हा कुठे सुटका झाली. स्वाक्षरी घेण्यासाठी आलेली लहान मुलं हिरमुसल्या चेहऱयाने माझ्याकडे पाहायला  लागली.

एका प्रतिष्ठित पारितोषिक वितरण सोहळ्याच्या वेळी माझा पास टीव्ही वाहिनीच्या एका कर्मचाऱयाकडे होता. कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये ती अडकल्याने तिने मला दहा मिनिटे थांबा. मी येतेच असं सांगितलं. मी थांबलेलो असताना सिक्युरिटीचा माणूस आला आणि मला म्हणाला ‘‘काय सर, तुम्हाला कोण पास विचारणार! तुम्ही जा आत.’’ तोच गैरसमज. त्याला मी मुकेश खन्ना वाटलो होतो. मी आत गेलो. मला एका खुर्चीवर बसवण्यात आलं. कहर झाला, जेव्हा अर्ध्या तासाने खऱया मुकेश खन्नाने एन्ट्री मारली. त्या सिक्युरिटीवाल्याची काय हालत झाली असेल ते मी समजू शकतो.

‘मस्का’ हा माझा मित्र प्रियदर्शन जाधव लेखन व दिग्दर्शन असलेला त्याचा पहिला सिनेमा. त्या सिनेमाचा मी कार्यकारी निर्माता होतो. त्या सिनेमात माझ्यासाठी म्हणून प्रियदर्शनने चिन्मय मांडलेकर आणि अनिकेत विश्वासरावबरोबर एका दृश्यात माझं पात्र पेरलं होतं आणि त्या पात्राचं नाव ‘शक्तिमान’ ठेवलं होतं. आहे की नाही गंमत! प्रेक्षकांची प्रतिक्रिया पाहण्यासाठी मी मुद्दाम चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहिला. सिनेमा सुरू झाला तेव्हा मला कोणीच ओळखलं नव्हतं, पण शो सुटल्यावर बाहेर पडताना मला अनेकांनी ओळखलं आणि लगेच मोबाइल फोन बाहेर निघाले, माझ्या सोबत धडाधड सेल्फी घेत सुटले.

असे अनेक प्रसंग होऊन गेले आणि आजही होत असतात. नुकताच एका मॉलमध्ये मी जेवायला गेलो होतो. हात धुऊन बाहेर येतो तर तिथे एक बाई आणि तिची वयस्कर आई माझ्यासाठी थांबून होते. मी त्यांच्याकडे सहज पाहिलं तर त्या दोघी माझ्याकडे बघून स्मितहास्य देत होत्या. “सेल्फी काढू का तुमच्या बरोबर,’’ असं विचारलं. मीही निरागसपणे हसलो आणि त्या दोघींबरोबर सेल्फी काढला. मी निघणार इतक्यात त्या मला म्हणाल्या की, महाभारतातली भीष्माची व्यक्तिरेखा त्या कधीच विसरू शकत नाहीत. मग माझी टय़ूब पेटली की, याचसाठी केला होता त्या दोघींनी अट्टहास! मी त्यांनाही तेच सांगितलं की, तो मी नव्हेच!

पण असं प्रत्येकाला नाही सांगू शकत. कारण मला कळायच्या आत मॉलमध्ये, मेट्रोमध्ये लोक न विचारताच पटकन फोटो काढून मोकळे होतात.  मी फक्त त्यांना ‘मी कोण’ हे नेहमीच ठासून सांगतो आणि इतकंच सांगू इच्छितो की, या जगात सात जण एकसारखे दिसणारे असतात असं म्हटलं जातं, पण त्यातला एखादा मुकेश खन्नासारखा सेलिब्रिटी निघाला तर तो निव्वळ योगायोग समजावा. कारण… कारण… तो मी नव्हेच!

[email protected]

(लेखक fिक्रएटिव्ह हेड, अभिनेते आणि गायक आहेत.)