खाऊगल्ली- उन्हाळ्यात खा गारेगार कुल्फी!

 

>> संजीव साबडे

चिलमीच्या आकाराची डबी दाबल्यावर बाहेर आलेल्या  कुल्फीचे पानावर तुकडे करून खाण्याचा नॉस्टॅल्जिक अनुभव देणारी कुल्फी म्हणजे उन्हाळ्यातला खरा गारवा. सध्या काडीला अडकवून मिळणाऱया या  कुल्फीच्या जगात असंख्य बदल झाले आहेत. हे बदल टिपत गारेगार कुल्फी खायलाच हवी.

पूर्वी घरात बसलो की, रस्त्यावरून अनेक आवाज यायचे. सकाळी लवकर सायकलची बेल वाजवत पाववाला येई. दिवसभरात ‘पाटय़ाला टाकी’, ‘केला लो केला’, ‘भाजी लो भाजी’, ‘कल्हईवाले कल्हई’, ‘डबाबाटलीवाला’, ‘पुराना कपडा दे के बर्तन लो’, ‘चाकू छुरी को धार’, ‘चनासिंग कुरमुरा’ वगैरे. उन्हाळ्यात संध्याकाळी पांढरा सदरा, पायजमा, डोक्यावर पांढरी गांधी टोपी आणि त्यावर लाल कापड गुंडाळलेलं मडकं घेतलेला माणूस “कुल्फी घ्या कुल्फी’’ ओरडत आला की, मुलं व मोठेही बाहेर येत. त्याला हाक मारत. चिलमीच्या आकाराच्या डबीत ती कुल्फी असे. ती डबी दोन्ही हातांनी दाबल्यावर बाहेर आलेली कुल्फी एका पानावर घेऊन व तिचे तुकडे करून तो देई. भोर, सासवडच्या लोकांकडील कुल्फी मस्त असे. आताही गिरगाव, जुहू, दादर या चौपाटय़ांवर आणि मुंबईच्या गल्लीबोळात वा काही रेल्वे स्टेशनच्या परिसरात हे कुल्फीवाले दिसतातच. फरक इतकाच की, आता त्यांच्याकडील कुल्फी काडीला अडकवून मिळते. त्यांची पायपीट खरोखर कमालीची.

मुंबईत पूर्वी सर्वत्र कुल्फी मिळायची नाही. त्यांची मोजकी दुकानं शोधावी लागत, पण आता जवळपास सर्व मोठय़ा आईक्रीम ब्रँडची कुल्फी बाजारात आली आहे. मेवाड आईक्रीमच्या गाडय़ा बऱयाच जागी उभ्या दिसतात. चौपाटय़ांवर तर ही दुकानं एकमेकांना चिकटून आहेत. तरीही एखाद्या विवाह समारंभात जेवणानंतर कुल्फी असेल तर लहान नव्हे, तर मोठे आणि अगदी मधुमेहीसुद्धा ती खाल्ल्याशिवाय राहत नाहीत. बहुतांशी ठिकाणी मलाई कुल्फीचे काप प्लेटमध्ये देतात. काही ठिकाणी मटका कुल्फी असते. सासवड व भोर येथील मराठी कुल्फीवाले सोडले तर पूर्वापार कुल्फीचा धंदा उत्तर हिंदुस्थानींकडे आहे. गोवा, तामीळनाडू, केरळ आणि आंध्र व कर्नाटकातही समुद्र किनाऱयांवर उत्तर हिंदुस्थानी व राजस्थानी कुल्फीवालेच दिसतात.

मुंबई व ठाण्यात कुल्फीचे ब्रँडेड व नॉन ब्रँडेड खूप प्रकार आलेत. आणखी तीन-चार महिने कुल्फी खाण्याची सर्वांना संधी आहे. अतिशय उत्तम, पण महागडी कुल्फी म्हणजे पारसी डेअरीची. अत्यंत दाट दूध आटवून ती केली जाते. त्यात आरारुट वगैरे अजिबात नसतं. अर्थात त्यांचे सर्व दुग्धजन्य पदार्थ उत्तम व महागडे. अलीकडील काळात ‘ग्रामीण कुल्फी’ नावाचा ब्रँड मुंबई व वसई तालुक्यात लोकप्रिय होत आहे. नालासोपारा पूर्व व मुंबईतील गोरेगाव, जोगेश्वरी व बोरिवली (पश्चिम) परळ, ऐरोली व खारघर अशा सहा सात ठिकाणी ही कुल्फी मिळते. अतिशय स्वादिष्ट, विविध चवी व दाट अशी ही कुल्फी आहे. कपूर कुल्फी 80/82 वर्षांपूर्वी सुरू झाली. मरीन लाइन्सच्या चंदनवाडी भागात. तेव्हा कुल्फीच्या फार व्हरायटी नव्हत्या. आता पेरू, चिकू, आंबा, बटरस्कॉच, गुलाब, बदामपिस्ता, अंजीर, काफी कुल्फीही ते बनवतात. गिरगाव चौपाटी, जोगेश्वरी, धारावी, सायन-माहीम रोड, बोरिवली या ठिकाणी कूपर कुल्फी मिळते, पण गिरगाव चौपाटी हे सर्वांसाठी सोयीचं ठिकाण, पण मिरची कुल्फी खायची असेल तर बॅलार्ड इस्टेट भागातील कोचीन स्ट्रीटवरील बॉम्बे नेटिव्हला भेट द्यावी लागेल. तेथील कुल्फी एकदम भन्नाट. साकीनाका आणि रहेजा विहार, पवई या ठिकाणी मिळणारी दामोदर कुल्फीही अतिशय लोकप्रिय आहे. वरील दोन ठिकाणीही ती मिळते आणि ऑनलाइन ऑर्डर करूनही ती घरी मागवू शकता. त्यांच्या कुल्फीमध्ये मलाई, सीताफळ, ब्लू बेरी, हेजलनट, अंजीर, केसर पिस्ता अशा वेगवेगळ्या प्रकारच्या चवी आहेत आणि कुल्फी कँडीही ते बनवतात.

गोरेगावात पश्चिमेला बेलवलकरवाडीजवळच्या किरण इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये ईगलची कुल्फी अवश्य खा. हल्ली दुपारी व संध्याकाळी तिथे गर्दी दिसू लागली आहे. तिथे कुल्फी रोल व कँडीमध्ये केसर पिस्ता, मलाई, गुलाब, चॉकलेट, हनिडय़ू, टुटीफ्रुटी, चॉकलेट चिप्स, अंजीर, रोस्टेड बदाम असे अनेक फ्लेवर्स आहेत. तुम्हाला मधुमेह आहे आणि फार कॅलरीज न वाढवता कुल्फी मात्र खायची असेल तर त्यासाठी चर्चगेटला जाण्याखेरीज पर्याय नाही. स्टेशनच्या समोरच इरॉस सिनेमाची बिल्डिंग आहे. तिथे गेट आहे अवे आईक्रीम, पण तिथे बिनसाखरेची आणि तीन-चार स्वादातील खूप छान कुल्फी मिळते.

‘नवराई माझी लाडाची लाडाची गं’ हे लोकप्रिय गाणं सर्वांना आठवत असेलच, पण ठाण्यात एका दुकानाचं नाव ‘लाडाची कुल्फी’ आहे. आईक्रीमपेक्षा सर्वांना कुल्फी अधिक आवडत असल्याने वर्तक नगर, पोखरण रोडवरील दुकानाला हे नाव दिलं असावं. आंबा व सीताफळ मस्तानी, लाल पेरू, शाही कुल्फी असे बरेच प्रकार तिथे आहेत. ‘पुणे तिथे काय उणे’ असं म्हटलं जातं. तसं आता ‘ठाणे तिथे काय उणे’ असं म्हणायला हवं. ठाण्यातच घंटाळी भागात कुल्फी हाऊसमध्ये कुल्फी व फालुद्याचे 25/30 प्रकार आहेत. शिवाय कुल्फी व ताजी फळे एकत्र असाही प्रकार. कुल्फी हाऊस वागळे इस्टेटमध्येही आहे. ठाण्यात देवांग आणि श्याम कुल्फी या दोन ठिकाणीही भेट द्यायलाच हवी. वसंत विहारमधील श्याममध्ये मिक्स फ्रूट, चॉकलेट, आंबा, सीताफळ, अंजीर या चवीची कुल्फी, फालुदा व आईक्रीम आहे. शिवाय ठाण्यात एक श्रीराम कुल्फीही आहे. देवांग नौपाडय़ात गोखले रोडवर आहे. तिथली राजभोग, अमेरिकन नट आणि सीताफळ कुल्फी खास. शेजारीच त्यांचा चाट कॉर्नरही आहे.

दादर ही तर मुंबईकरांची व मराठीची सांस्कृतिक राजधानी. तिथे मराठी खाद्य पदार्थ हमखास मिळतात. दादर पश्चिमेच्या रानडे रोडवर वैद्य कुल्फी व फालुदा हे ठिकाणही असंच खास. तिथे नेहमीच्या कुल्फीबरोबरच ब्लॅक करंट, रासबेरी, स्ट्रॉबेरी, काजू चॉकलेट हे प्रकार मस्तच! बिनसाखरेची मलाई व केसर पिस्ता कुल्फीही इथे मिळते. कुल्फी कँडी, प्लेन व सीझनल कुल्फी आणि स्पेशल कुल्फी असे प्रकार असले तरी कमाल दर 60 रुपये व किमान दर 35 रुपये म्हणजे बरंच वाजवी आहेत. याखेरीज केळुस्कर रोडवरील कुल्फी कॉर्नर, गोखले रोडवर सद्गुरू कुल्फी, माहीमच्या कटारिया मार्गावर कुल्फी कनेक्शन, सायन कोळीवाडय़ातील डिलाइट पंजाबी कुल्फी आणि वडाळा अँटॉप हिल भागात जोशी कुल्फी इथे अधूनमधून जायलाच हवं. कुल्फीच्या जगात होणारे बदल पाहण्यासाठी आणि आनंदात राहण्यासाठी उन्हाळ्यात सतत कुल्फी खात राहावी… या वा कोणत्याही ठिकाणची!

 [email protected]