ठसा – प्रवीण बांदेकर

>> प्रशांत गौतम

प्राध्यापक, लेखक, कवी आणि साहित्य चळवळीतील कार्यकर्ते अशी ओळख प्रवीण बांदेकर यांची सांगितली जाते. कोकणातील सावंतवाडी परिसरात राहून ते विविध भूमिकांतून सारस्वतांची सेवा करीत असतात. त्यांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीस नुकताच साहित्य अकादमी सन्मान घोषित झाला, तर त्यांच्या सोबतच ‘सलोख्याचे प्रदेश’ अनुवादासाठी प्रमोद मुजुमदार यांनाही अकादमी पुरस्कार घोषित झाला आहे. ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीत त्यांनी अस्मितेची वाटचाल होत असताना बुद्धिजीवी वर्गाची प्रतिगामित्वाकडे वाटचाल आणि हरवलेल्या आधुनिकतेचा वेध घेतला आहे.

साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाल्यावर लेखक प्रवीण बांदेकर म्हणाले,राष्ट्रीय स्तरावरील अकादमी पुरस्कार मिळाल्याचा आनंद आहे. यानिमित्ताने या अघोषित दडपशाहीच्या पार्श्वभूमीवर बोलू पाहणाऱ्याला हा पुरस्कार मिळणे हे म्हणूनच महत्त्वाचे आहे. आपल्या लेखनामधून न बोलणाऱ्या समाजाचे प्रतिनिधित्व करता यावे असे मी मानतो.या मूक समूहाचा आवाज सर्वदूर पोहोचावा, त्याची दखल घेतली जावी, त्याला न्याय मिळावा हीच आपली लेखनामागील भूमिका कायम राहिली आहे. या कादंबरीसंदर्भात हरिश्चंद्र थोरात म्हणतात,‘‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’मध्ये बांदेकर अधिक सूक्ष्म आणि अमूर्त पातळीवरील प्रक्रियांमध्ये उतरतात.

या प्रक्रिया मानवी अस्मितेच्या जडणघडणीशी आणि तिच्याशी जोडलेल्या विविध समस्यांशी निगडित आहेत. हेच या कादंबरीचे केंद्रवर्ती आशयसूत्र आहे. ही कादंबरी म्हणजे प्रचलित संवेदनशीलतेमध्ये अप्रस्तुत होत गेलेल्या आधुनिकतेच्या प्रकल्पावरचे, मूल्यव्यवस्थेच्या विराट अधःपतनावरचे अस्वस्थ करणारे भाष्य आहे. या भाष्याचे वेगवेगळे स्तर, त्यांच्यामध्ये होणारी गुंतागुंत, तिच्यात अडकलेली मानवी आयुष्ये हे सारे बाहुल्यांच्या खेळाच्या पारंपरिक संकल्पनेला विलक्षण सर्जनशील करत प्रवीण दशरथ बांदेकरांनी मूर्त केले आहे.’’ या कादंबरीसंदर्भात  संदीप निंबाळकर हे एक आठवण सांगतात, आज आपण प्रा. प्रवीण बांदेकरांच्या ‘उजव्या सोंडेच्या बाहुल्या’ या कादंबरीला मिळालेल्या साहित्य अकादमी पुरस्काराची चर्चा करतो आहोत; पण ही कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर समाजविघातक संस्था, संघटनांनी प्रा. बांदेकरांना जिवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर बांदेकर यांना सतत पोलीस संरक्षणात राहावे लागत होते. बांदेकरांसारख्या कोकणच्या प्रतिभावंत लेखक, कवीच्या अभिव्यक्तीवर आघात होत असताना अशा अपप्रवृत्तीचा निषेध करण्यासाठी आपण एकत्र आलो नव्हतो हेदेखील वास्तव विसरता येणार नाही. बांदेकर व त्यांच्या कुटुंबीयांनी यासाठी फार मोठी किंमत मोजली आहे.या कालावधीत हे कुटुंब प्रचंड तणावातून गेले आहे. साहित्यिकांनी लिहिते राहिले पाहिजे असेल तर बांदेकरांसारख्या लेखकांच्या मागे समाजाचे पाठबळ सतत राहिले पाहिजे. प्रवीण बांदेकर हे सावंतवाडी येथे राणी पार्वतीदेवी कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाचे प्राध्यापक आहेत. कविता, कादंबरी, ललित, समीक्षा लेखन अशा क्षेत्रांत त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे.

येरू म्हणे,खेळखंडोबाच्या नावानं, चिनभिन (कवितासंग्रह) चाळेगत, उजव्या सोंडेच्या बाहुल्या,  इंडियन अँनिमल फार्म (कादंबरी), घुंगूरकाठी, हरवलेल्या पावसाळ्यांचा शोध, अरते ना परते (ललित लेख), चिंटू चुळबुळे (बालसाहित्य) असे साहित्य त्यांच्या नावावर आहे. या लेखन योगदानासाठी त्यांना इंदिरा संत राज्य पुरस्कार, बेळगावचा कृ. ब. निकुंब पुरस्कार, नगर येथील संजीवनी खोजे पुरस्कार, आजरा येथील शिवाजी सावंत पुरस्कार, कोल्हापूर येथील राजर्षी शाहू पुरस्कार, पुणे येथील मसापचा ह.ना.आपटे पुरस्कार, शब्द प्रकाशन मुंबईचा बाबूराव बागुल पुरस्कार, अनुष्टुभचा विभावरी पाटील पुरस्कार, सोलापूरचा दमाणी, लोकमंगल पुरस्कार, प्रवरानगरचा विखे पाटील पुरस्कार, लोकमंगल पुरस्कार,अमेरिकेतील महाराष्ट्र फाऊंडेशन पुरस्कार,संभाजीनगर येथील बी. रघुनाथ पुरस्कार, जळगाव येथील जैन फाऊंडेशनचा ना.धों. महानोर पुरस्कार लाभला, तर ‘चाळेगत’ कादंबरी शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ, सोलापूर येथे अभ्यासक्रमात समाविष्ट झाली. ‘मालवणी कविता’चा मुंबई विद्यापीठ व ललित लेखसंग्रहाचा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात समावेश झाला. एवढेच नाही तर अनेक विद्यापीठे व शालेय पाठय़पुस्तकांतून साहित्य अभ्यासासाठी समाविष्ट झाली.

अनेक विद्यापीठांतून या साहित्यावर एमफिल व पीएचडीसाठी संशोधन झाले व होत असते. बांदेकर हे राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य आहेत. सावंतवाडी येथील श्रीराम वाचन मंदिराचे कार्याध्यक्ष आहेत, सिंधुदुर्ग साहित्य संघाचे अध्यक्ष आहेत, तर नवसाक्षर दर्शन, साप्ताहिक वैनतेयचे संपादकपद त्यांनी भूषवले. साहित्य अकादमी पुरस्काराने या सर्व वाटचालीचा उचितच गौरव झाला आहे.