विज्ञान रंजन – शिवण कहाणी

>> विनायक

सौचिकः वस्त्रं सीव्यति’ म्हणजे शिंपीकाम करणारे वस्त्र शिवतात असा प्राचीन उल्लेख आपल्याकडे आढळतो. म्हणजे शिवणकलेचा विकास आपल्याकडेही प्राचीन काळी झाला असावा. जगाचा ‘शिवणाचा’ इंतिहास पार अश्मयुगापर्यंत जातो. प्राण्यांची कातडी सुकवून त्यांच्या शरीरातील चिवट तंतूंचे दोरे बनवून हाडांच्या सुईने शिवलेले तंबू आदिमानव तयार करत असत. तसेच मोठय़ा पानांच्या वनस्पतीपासून मिळालेली टिकाऊ पानं आणि तंतूंचे धागे यापासून वनस्पतीजन्य ‘वल्कलं’ विणली आणि शिवली जायची.

हळूहळू धागे विणण्याचा आणि कापडापासून विविधरंगी तसंच विविध आकारांचे कपडे बनवण्याचा काळ उदयाला आला, तोसुद्धा काही हजार वर्षांपूर्वी. विणलेलं सुती, रेशमी कापड घेऊन त्यापासून कपडे शिवून घेणं ही गोष्टही किमान हजार वर्षांपूर्वीपासूनची असावी. साधारण त्या काळातले शिवलेले काही कपडे म्युझियममध्ये पहायला मिळतात. दहाव्या शतकाच्या आसपास शिवणकला बहरली. आपल्याकडे मौर्यांच्या स्थिर राजवटीत विणकाम आणि शिंपीकामाला भरभराटीचे दिवस आले. युरोपातही चौदाव्या शतकापासूनचे हाती शिवणकामाचे ठोस दाखले मिळतात. अर्थात चार ते दहा हजार वर्षांपूर्वीही प्राथमिक स्वरूपातलं शिवणकाम होत असावं असा अंदाज आहे.

आम्हाला शाळेत (55 वर्षांपूर्वी) शिवणकाम, विणकाम आणि कधीतरी सुतारकाम तसंच मुलींना स्वयंपाकाचे धडे देणारे विशेष तास असायचे. घरीसुद्धा आई करत असलेलं शिवणकाम, विणकाम पाहून ते थोडं थोडं येऊ लागलं. सुतारकाम करून भावासह एक बऱ्यापैकी कपाट बनवल्याचंही आठवतं. ‘मल्टिफोकस’ किंवा ‘ऑप्टिटय़ूड बेस्ड’ शिक्षण असे शब्दप्रयोग तेव्हा नव्हते, पण माझ्या बरोबरीच्या प्रत्येकाला फाटलेला सदरा शिवता येत होता. आता तर धागा उसवलेल्या ‘रिप्ड’ कपडय़ांची ‘फॅशन’ आलीय आणि ती ‘स्टेटस’ची गोष्ट ठरते. हा काळाचा अजब महिमा!

राजेशाहीच्या काळात राजशिंपी असत. इंग्लंडमधील ससेक्स परगण्याचा अर्ल (उमराव) हा आठव्या हेन्रीच्या राज्यारोहणाच्या वेळी राजशिंपी (लॉर्ड स्युअर) म्हणूनही काम पाहत होता.

मात्र संपूर्ण जगात घरघरातलं नैमित्तिक शिवणकाम महिलाच करत असत. घराच्या सर्व जबाबदाऱ्यांपैकी ते एक असायचं. स्वयंपाकपाणी, धुणीभांडी वगैरे झाल्यावर दुपारच्या वेळात निवड-टिपण आणि कपडे शिवण्याचं काम किंवा आवडीने विणकामही केलं जायचं हे घरातच पाहिलंय. मध्ययुगापासूनच्या या पद्धती अगदी विसाव्या शतकाच्या शेवटच्या दशकापर्यंत दिसत होत्या. एकविसाव्या शतकात जीवनमान सुधारलं तशी जीवन पद्धतीही बदलली. अनेक कामं तर यंत्रं करू लागलीच, पण विविध खाद्यपदार्थही घरपोच मिळू लागले आणि अनेक कामं ‘जुनी’ झाली. त्यातलंच एक घरगुती शिवणकाम. सुईत दोरा ओवण्याची ‘स्पर्धा’ घेऊन आई आम्हा भावांकडून ते काम करून घ्यायची. त्यामुळे आजही जुजबी शिवणकाम हाती करता येते. पुढे शिवणयंत्रं आल्यावर ते घराघरांत आलं आणि कपडे वेगाने शिवले जाऊ लागले.

जगातलं पहिलं शिवणयंत्र बनवलं फ्रान्सच्या थॉमस सेंट यांनी. त्यांनी त्याचं पेटंटही (एकाधिकार) घेतलं. मात्र 1840 पासून विविध युरोपीय कंपन्यांनी मजबूत म्हणजे अगदी शतकभर टिकणारी शिवणयंत्रं बनवली. मेकॅनिकल इंजिनीअरिंगने जगाला टिकाऊ वस्तूंची देणगी दिली. त्यात सायकलपासून लंबकाच्या घडय़ाळापर्यंत अनेक वस्तू येतात. 1920 च्या सुमाराला घेतलेलं आमच्याकडचं घडय़ाळ आजही योग्य वेळ दाखवतं.

युरोपात इकडूनच कापूस, रेशीम नेलं जायचं आणि तिकडून त्याचंच बनवलेलं कापड आणि कपडे आपल्याकडे महागडय़ा दरात विकले जायचे. ते इथल्या मोजक्या श्रीमंतांना परवडणारे असले तरी गरीब जनता हातमागावर विणलेल्या कापडाचे कपडे वापरत होती. अधरीय, उत्तरीयचा काळ जाऊन धोतराऐवजी विदेशी पॅंट आणि वर पांघरायची उपरणं, पंचांऐवजी किंवा बाराबंदीच्या जागी मस्त शिवलेले शर्ट आले आणि शहरी भागातली, विशेषतः पुरुषांची वेशभूषा आमूलाग्र बदलली. स्त्रिया मात्र साडीच नेसत होत्या. आता त्यातही कालपरत्वे बदल झाला. असे बदल परिहार्य असतात. आता तर निराळीच फॅब्रिक संस्कृती आली आहे. पूर्वी ‘फॅशन’ क्वचित यायची. आता ती क्षणाक्षणाला बदलते.

…तर मूळ मुद्दा पूर्वीच्या घरच्या हाती शिवणाचे सदरे, गोधडी, लहान बाळाचं दुपटं आणि कपडे असे कितीतरी कपडे घरगुती शिवणकामाचा भाग होते. शिवणयंत्र आल्यावर ते अधिक सुबक, टिकाऊ झाले. शिवणयंत्राच्या शिवणीत सुईतला आणि खालच्या बॉबिनमधला धागा यांची जोड मिळून उत्तम शिलाई होऊ लागली. संशोधनाचा हा मोठाच फायदा होता. सुरुवातीला पायाने गती देत चालवण्याच्या मशीनच्या जागी विजेवर चालणारी शिलाईयंत्रं आली. जुन्या यंत्रांना ‘इलेक्ट्रिक मोटर’ बसवून फिरवता येऊ लागलं. पुढे घराघरांतील हे यांत्रिक शिवणही मंदावलं.

…तरीही शिंपीकाम करणाऱ्यांचा व्यवसाय सणासुदीच्या काळात तेजीचा असतो. ज्यांना कपडय़ांचं ‘फिटिंग’ आपल्या शरीरयष्टीनुसार हवं असतं ते कपडे शिवूनच घेतात. तयार कपडे घेण्याबरोबरच उत्तम कापडाचे कपडे शिवून घेणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशी ही शिवणकामाची थोडक्यात कहाणी. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की, फाटक्या कपडय़ाला वेळीच एक टाका पुरतो. नाहीतर पुढे नऊ टाके घालावे लागतात (‘अ स्टिच इन टाईम सेव्हज् नाईन’) ही गोष्ट योग्य काम करण्याचा संदेश देण्यासाठी, आळशीपणा घालवण्याचा उपदेश करणारी आहे.