जनता तुमच्यावर थुंकत आहे, शहिदांच्या विधवा तुम्हाला शाप देतील; संजय राऊत यांची भाजपवर सडकून टीका

‘आदर्श’ घोटाळय़ाच्या दबावाखाली असलेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी अखेर काँग्रेसचा हात सोडला. चव्हाण हे मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. महाराष्ट्रात घडत असलेल्या या राजकीय घडामोडींवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सडकून टीका केली आहे. भाजपच्या देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला सिंचन घोटाळा, आदर्श घोटाळा कसा घडला हे समजावून सांगितले. त्याच्या व्हिडीओ क्लिप आजही उपलब्ध आहेत. आज रात्री शांतपणे देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे आणि त्यांच्या लोकांनी भाजप कार्यालयात मोठ्या पडद्यावर आपल्या क्लिप ऐकाव्यात. मोदी काय बोलले तेही ऐकावे आणि शांतपणे विचार करावा की ‘कुठे नेऊन ठेवलाय भाजप माझा’, असा टोला राऊत यांनी लगावला.

छत्रपती संभाजीनगर येथे पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी म्हटले की, अशोक चव्हाण म्हणजे काँग्रेस नाही. ते कालपर्यंत आमच्यासोबत जागावाटपाची चर्चा करत होते, काही जागांसाठी ते काँग्रेसतर्फे आग्रही भूमिका मांडत होते. मविआवर अशोक चव्हाण यांच्या जाण्याने काहीही परिणाम होणार नाही. संजय राऊत यांनी म्हटले की, “पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या दृष्टीने युपीए काळात सगळ्यात मोठा घोटाळा हा आदर्श घोटाळा होता. त्याचे मुख्य सूत्रधार अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करत आहे, जनता तुमच्यावर थुंकत आहे. शहिदांच्या विधवा सुद्धा तुम्हाला शाप दिल्याशिवाय राहणार नाही.”

चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते

अशोक चव्हाण हे 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस सोडणार होते, एकनाथ शिंदे यांच्याबरोबरच त्यांची काँग्रेस सोडण्याची योजना होती. अशोक चव्हाण गेल्या काही काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपडत आहेत. त्यांनी घेतलेला हा निर्णय काँग्रेससाठी धोक्याचा नसून त्यांच्या स्वत:च्या राजकीय भविष्यासाठी धोक्याचा आहे, असे राऊत यांनी म्हटले

काँग्रेसचे शुद्धीकरण

संजय राऊत यांनी भाजपच्या फोडाफोडीच्या राजकारणावर टीका करताना म्हटले की, भाजपचे काँग्रेसमुक्त भारत ही घोषणा बदलायला हवी. काँग्रेसमध्ये भ्रष्टाचाराचे ज्यांच्यावर आरोप आहेत त्यांना सगळ्यांना आपल्या पक्षात घेऊन त्यांनी काँग्रेसचे शुद्धीकरण चालवले आहे, महात्मा गांधींचे काँग्रेस शुद्धीकरणाचे स्वप्न भाजपने स्वीकारलेले दिसतंय. ते पुढे म्हणाले की, आमच्यापुढे पेच आहे की पंतप्रधान मोदी देशाला काय तोंड दाखवतील ? पंतप्रधानांच्या शिरपेचात खोटेपणाचा आणखी एक तुरा महाराष्ट्र भाजपने रोवलाय का ? नांदेडमध्ये जाऊन मोदी यांनी कारगिल युद्धातील शहिदांच्या भूखंडावर अशोक चव्हाणांनी कशा प्रकारे घोटाळा केला आणि शहिदांचा अपमान केला हे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. भाजपने शहिदांच्या अपमानाविरोधात महाराष्ट्रात आंदोलन सुरू केलं, आज त्या शहिदांच्या अपमानाचे काय झाले ?