मराठा आंदोलकांनी अशोक चव्हाणांची गाडी अडवली, आंदोलकांचा रुद्रावतार पाहून माघारी परतले

माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर यांच्या सभेत गोंधळ घालण्याचा प्रकार ताजा असतानाच सोमवारी नुकतेच नवहिंदुत्ववादी झालेले अशोक चव्हाण यांची गाडी मराठा आंदोलकांनी अडवली. आंदोलकांचा रुद्रावतार पाहून अशोक चव्हाणांवर माघारी परतण्याची वेळ आली.

नुकतेच भाजपमध्ये आलेले खासदार अशोक चव्हाण हे आज अर्धापूर तालुक्यातील कोंढा येथे भाजपचे उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी गेले होते. मात्र, गावात येण्यापूर्वीच त्यांना मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागले. त्यांची गाडी गावात येताच मराठा आंदोलकांनी अडवली. राजकीय प्रचारासाठी गावात यायचे नाही, असे म्हणत आंदोलकांनी ‘एक मराठा, लाख मराठा’ अशा घोषणा सुरू केल्या. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. पण गावकर्‍यांचा रोष एवढा जबरदस्त होता की, कोंढा येथील प्रचाराची बैठक न घेताच अशोक चव्हाण यांना माघारी परतावे लागले.