बेन स्टोक्स वर्ल्ड कप खेळणार, ही अफवाच!

कसोटी क्रिकेटला थरारक आणि रोमहर्षक करणाऱया इंग्लंडचा कसोटी कर्णधार बेन स्टोक्स आगामी आयसीसी वर्ल्ड कपमध्ये खेळणार असल्याचे वृत्त अखेर अफवाच ठरली आहे. खुद्द स्टोक्सने आपण आपली वन डे निवृत्ती मागे घेणार नसल्याचे सांगून आपण वर्ल्ड कप खेळणार नसल्याचे स्पष्ट केले. 

गेल्या वर्षी जुलै 2022 मध्ये त्याने कसोटी क्रिकेटवर आपले लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टोक्सने आपली एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत इंग्लंडला जगज्जेते बनविल्यानंतर स्टोक्सच्या वन डे निवृत्तीबाबत वारंवार अफवा येत होत्या. या स्पर्धेत अंतिम सामन्यात स्टोक्सने पाकिस्तानविरुद्ध झंझावाती खेळी करत आपल्या संघाला जगज्जेतेपद मिळवून दिले होते. या कामगिरीनंतर स्टोक्सची वन डे संघाला गरज असून तो आपली निवृत्ती मागे घेणार आणि हिंदुस्थानात होत असलेल्या वर्ल्ड कपमध्ये खेळणार, अशा वृत्तांना उधाण आले होते. ते वृत्त आजही पुन्हा झळकले आहे. 

वन डेतील निवृत्तीनंतर स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंडचा संघ कसोटी क्रिकेटमध्ये वन डे क्रिकेटला साजेसा आक्रमक खेळ बॅझबॉलच्या नावाखाली खेळतोय. गेले वर्षभर इंग्लंडचा संघ बॅझबॉल वृत्तीने खेळ करत असला तरी त्यांच्या खेळाची सर्वाधिक चर्चा सध्या सुरू असलेल्या ऍशेस मालिकेदरम्यान झाली आणि अवघे क्रिकेट विश्व इंग्लंडच्या बॅझबॉलवृत्तीच्या प्रेमात पडले. इंंग्लंडच नव्हे तर कसोटी क्रिकेटचे रूप पालटवणाऱया बॅझबॉलचा नेता वन डे संघातही असावा, असे प्रामाणिक मत प्रत्येक इंग्लिश चाहत्याच्या मनात आहे. 

वर्ल्ड कप नव्हे हॉलिडे

स्टोक्सच्या वनडे पुनरागमनाच्या कितीही बातम्या पसरवल्या जात असल्या तरी त्यात काहीही तथ्य नाही. गेल्या वर्षी तो स्वताच म्हणाला होता, वर्ल्ड कपदरम्यान मला कसे वाटते, यावर सारे अवलंबून आहे. वर्ल्ड कपसारख्या स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करायला मिळणे ही एक अभिमानाची गोष्ट आहे, पण मी सध्या त्याचा विचारही करत नाही. ही झाली प्रतिक्रिया गेल्या वर्षीची, पण आता तो म्हणाला, मी वन डेतून निवृत्ती मागे घेणार नाही. कारण ऍशेस मालिकेनंतर मी सुट्टीवर जाणार आहे. त्यामुळे स्टोक्स ऍशेसनंतर वन डेत नव्हे तर हॉलिडेमध्ये बॅटिंग करताना दिसेल, एवढे मात्र निश्चित झाले आहे.