‘बेस्ट’चे तिकीट 7 रुपये होणार, एसीचा प्रवास 10 रुपयांपासून

प्रचंड वाढलेल्या महागाईने गोरगरीब-सर्वसामान्य होरपळत असताना आता मुंबई महानगरपालिकेनेही ‘बेस्ट’ला तिकीट दर वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. यात साध्या बसचे दर किमान पाच रुपयांवरून सात रुपये तर एसी बसचे किमान तिकीट सहा रुपयांवरून दहा रुपये होण्याची शक्यता आहे.

‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी हे निर्देश देण्यात आले आहेत. ‘बेस्ट’ने पालिकेकडे तीन हजार कोटींची मदत मागितली होती. पालिकेने ही मदत देण्यासाठी नकार देताना ‘बेस्ट’ने स्वतः आपली स्थिती सुधारण्यासाठी उत्पन्न वाढीच्या उपाययोजना करण्याच्या सूचनाही पालिकेने ‘बेस्ट’ला केल्या आहेत. रेल्वेनंतर ‘बेस्ट’ ही मुंबईकरांची दुसरी लाईफलाईन आहे. ‘बेस्ट’मधून दररोज तब्बल 35 लाखांवर प्रवाशी प्रवास करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती कमालीची खालावली आहे. बेस्टच्या स्वतःच्या मालकीच्या तब्बल पाच हजारांवर गाडय़ा होत्या. त्यांची संख्या आता पंत्राटदाराच्या बस मिळून तीन हजारांवर आली आहे. त्यामुळे दिवसाला मिळणारे साडेचार कोटींचे उत्पन्न आता दोन ते अडीच कोटींवर आले आहे. त्यामुळे ‘बेस्ट’ची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे पालिकेकडून ‘बेस्ट’ला अर्थसंकल्पात पालिकेकडून दरवर्षी मदत केली जात आहे. तरीदेखील बेस्टची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. त्यामुळे काटकसर आणि उत्पन्न वाढवण्याचे निर्देश पालिकेने ‘बेस्ट’ला दिले आहेत.

सध्याचे दर

5 किमी 5 रुपये
10 किमी 10 रुपये
15 किमी 15 रुपये
20 किमी 20 रुपये

एसी बसचे दर

5 किमी 6 रुपये
10 किमी 13 रुपये
15 किमी 19 रुपये
20 किमी 25 रुपये