तेलंगणात काँग्रेसचा मोठा विजय; केसीआर यांच्या स्वप्नांना सुरूंग

महाराष्ट्रासह देशभर आपला पक्ष विस्तारण्याचे स्वप्न पाहणाऱया मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती पक्षाला (बीआरएस) आपल्या राज्यात तेलंगणात सुरूंग लागला आहे. काँग्रेसने दणदणीत विजय मिळवला असून, भाजप तिसऱया क्रमांकावर फेकला गेला आहे. भाजपला दोन आकडी संख्याही पार करता आलेली नाही.
तेलंगणात विधानसभेच्या 119 जागा असून, सत्ता स्थापनेची मॅजिक फिगर 60 आहे. काँग्रेसने 65 जागा जिंकत बहुमत मिळविले. बीआरएसला 39 जागा मिळाल्या. भाजपला 8, तर अससुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएमला 7 जागा मिळाल्या आहेत. तेलंगणा राज्य निर्मितीनंतर 2014 पासून के. चंद्रशेखर राव मुख्यमंत्री आहेत. त्यांनी अनेक लोकप्रिय योजनांच्या घोषणा केल्या. मात्र, काँग्रेसने नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबविली. काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या प्रचार सभा, रोड शोला मोठा प्रतिसाद मिळाला. मतदारांनी राव यांच्या सत्तेला सुरूंग लावला आहे.

मुख्यमंत्रीपदाचा चेहरा रेवंत रेड्डी

तेलंगणात काँग्रेसच्या विजयात रेवंत रेड्डी यांचा वाटा मोठा आहे. मुख्यमंत्रीपदाचे प्रबळ दावेदार असलेले रेवंत रेड्डी हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत. लढाऊ आणि लोकप्रिय नेते असलेले 54 वर्षीय रेवंत रेड्डी यांचा राजकीय प्रवास रंजक आहे. मेहबुबनगर जिह्यातील रेवंत रेड्डी हे महाविद्यालयीन जीवनात अभाविपचे कार्यकर्ते होते. 2006ला ते जिल्हा परिषदेचे सदस्य झाले. 2007ला त्यांनी तेलगू देसम पक्षात प्रवेश केला आणि विधानपरिषदेचे आमदार झाले. तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष एन. चंद्राबाबू नायडू यांचे ते विश्वासू सहकारी बनले. आंध्रप्रदेश अखंड असताना ते तीन वेळा विधानसभेचे आमदार झाले. 2017ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, 2018च्या विधानसभा निवडणुकीत रेवंत रेड्डी पराभूत झाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत मलकाजगिरी मतदारसंघातून ते निवडून आले. जून 2021ला काँग्रेसने प्रदेशाध्यपदाची जबाबदारी दिली आणि रेवंत रेड्डी यांनी तेलंगणा राज्य पिंजून काढले. आज तेलंगणात काँग्रेसची सत्ता येण्यामागे रेवंत रेड्डी यांचा वाटा मोठा आहे.

दक्षिणेतील एकाही राज्यात भाजप नाही

काही महिन्यांपूर्वी कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने विजय मिळविला होता. आता तेलंगणात काँग्रेसची सत्ता आली आहे. दक्षिण हिंदुस्थानात एकाही राज्यात भाजपची सत्ता नाही. तामीळनाडूत द्रमुक आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आहे. केरळमध्ये माकप डावी आघाडी, पुद्दुचेरीमध्ये ऑल इंडिया एनआर काँग्रेस, आंध्र प्रदेशात वायसीआर काँग्रेस, कर्नाटकात काँग्रेस आणि आता तेलंगणात काँग्रेसची सत्ता आहे.