चिथावणीखोर भाषणबाजीत भाजपचे खासदार-आमदार आघाडीवर

bjp-logo

चिथावणीखोर भाषण (हेट स्पीच) करून लोकांची माथी भडकावण्यात भाजपचे खासदार आणि आमदार आघाडीवर आहेत. देशभरात एकूण 107 खासदार आणि अनेक आमदार यांच्याविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण केल्या प्रकरणी गुन्हे दाखल आहेत. द्वेषपूर्ण भाषण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल असूनही गेल्या पाच वर्षांत 480 उमेदवारांनी निवडणूक लढवली आहे. ‘असोसिएशन फॉर डेमोव्रॅटिक रिफॉर्म्स’चा (एडीआर) अहवाल नुकताच प्रसिद्ध करण्यात आला असून यातून ही माहिती उघड झाली आहे.

‘असोसिएशन फॉर डेमोव्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर) आणि नॅशनल इलेक्शन वॉचने (एनईडब्ल्यू) गेल्या पाच वर्षांत झालेल्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकी वेळी आमदार आणि खासदारांनी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रांच्या आधारावर ही माहिती गोळा केली आहे. देशातील 33 खासदारांनी द्वेषपूर्ण भाषण (हेट स्पीच) केले असून यात उत्तर प्रदेश (7), तामिळनाडू (4), बिहार (3), कर्नाटक (3), तेलगांणा (3), आसाम (2), गुजरात (2), महाराष्ट्र (2), पश्चिम बंगाल (2), झारखंड (1), मध्य प्रदेश (1), केरळ (1), ओडिशा (1), पंजाब (1) अशा खासदारांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांत द्वेषपूर्ण भाषण करणाऱया 480 उमेदवारांनी लोकसभा, विधानसभा आणि राज्यसभा निवडणूक लढवली, असे ‘एडीआर’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.

एकटय़ा भाजपचे 22 खासदार

द्वेषपूर्ण भाषण करणाऱया खासदारांमध्ये सर्वात जास्त खासदार हे एकटय़ा भाजपचे आहेत. ही संख्या 22 इतकी आहे. दोन काँग्रेसचे तर एक आम आदमी पार्टी आणि एक एमडीएमके, डीएमके आणि एका अपक्ष खासदाराचा यात समावेश आहे.

72 आमदारांकडून द्वेषपूर्ण भाषण

74 आमदारांनी द्वेषपूर्ण भाषण केले आहे. बिहार (9), उत्तर प्रदेश (9), आंध्र प्रदेश (6), महाराष्ट्र (6), तेलंगाणा (6), आसाम (5), तामीळनाडू (5), दिल्ली, (4), गुजरात (4), पश्चिम बंगाल (4), झारखंड (3), उत्तराखंड (3), कर्नाटक (2), पंजाब (2), राजस्थान (1), त्रिपुरा (1), मध्य प्रदेश (1), ओडिशा (1) अशा आमदारांचा समावेश आहे.

भाजपचे 20 आमदार

द्वेषपूर्ण भाषण करणाऱया आमदारांच्या यादीत एकटय़ा भाजपचे 20 आमदार आहेत. तर काँग्रेसचे 13, आपचे 6, सपा आणि वायएसआरसीपीचे प्रत्येक पाच, डीएमके आणि राजदचे प्रत्येकी चार, एआयएमआयएम, सीपीआई (एम), एनसीपी, सुहेलदेव भारतीय समाज पार्टी, टीडीपी, टिपरा मोथा पार्टी आणि टीआरएसच्या प्रत्येक एक-एक आमदाराचा समावेश आहे.