भाजपला लडाखची जमीन अदानींच्या घशात घालायचीय, राहुल गांधी यांचा हल्लाबोल

भारतीय जनता पक्षाला लडाखच्या लोकांची जमीन बळकावून अदानींच्या घशात घालायची आहे, असा घणाघाती आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी केला आहे. लडाख दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी कारगिलमध्ये सभेला संबोधित करताना त्यांनी हे विधान केले.

लडाखच्या लोकांना प्रतिनिधीत्व दिले तर ते तुमची जमीन बळकावू शकत नाहीत हे भाजपला चांगले ठावूक आहे. भाजपला लडाखची जमीन बळकावून अदानींच्या घशात घालायची आहे. अदानींना इथे कारखाना टाकायचा आहे. मात्र त्यांना याचा फायदा लडाखच्या लोकांना होऊ द्यायचा नाहीय. मात्र आम्ही असे होऊ देणार नाही, असा एल्गार राहुल गांधी यांनी केला.  चीनने हिंदुस्थानच्या हजारो किलोमीटर जमिनीवर कब्जा केला आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी खोटे बोलत आहेत. चीनने एक इंच जमिनीवरही कब्जा केला नसल्याचा मोदींचा दावा खोटा आहे, असा पुनरुल्लेखही त्यांनी केला.

राहुल गांधी लडाख दौऱ्यावर आहेत. आज अखेरच्या दिवशी राहुल गांधी यांनी कारगिलमध्ये एका सभेला संबोधित केले. यावेळी हिंदुस्थान-चीन सीमाभागात असणाऱ्या तणावावरही भाष्य केले. चीनने हिंदुस्थानची हजारो किलोमीटर जमीन बळकावली आहे. लडाखच्या लोकांनाही वास्तव माहिती आहे. त्यामुळे मोदींचा एक इंचही जमीन चीनने बळकावली नसल्याचा दावा खोटा असल्याचे राहुल गांधी म्हणाले. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि आरएसएसवरही निशाणा साधला.

काही महिन्यांपूर्वी आम्ही कन्याकुमारी ते कश्मीरपर्यंत ‘भारत जोडो यात्रा’ काढली. भाजप-आरएसएसद्वारा पसवण्यात आलेल्या द्वेषाविरोधात लढण्याच्या उद्देशाने ही यात्रा काढण्यात आली. द्वेषाच्या बाजारात प्रेमाचे दुकान उघडण्याचा संदेश याद्वारे देण्यात आला, असे राहुल गांधी म्हणाले.

राहुल गांधी यांनी ‘मन की बात’चाही समाचार घेतला. मी लडाखच्या कानाकोपरऱ्यात फिरलो. गरीब, महिला, तरुणांशी संवाद साधला. तुमच्या ‘मन की बात’ समजण्याचा प्रयत्न केला. दुसरे नेते स्वत:च्या ‘मन की बात’ करतात, पण मी लोकांची ‘मन की बात’ ऐकायला आलो, असे राहुल गांधी म्हणाले.