मध्यरात्री जीवघेणा थरार, बोरघाटात ट्रॅव्हल्सची बस पेटली; 35 प्रवासी बचावले

परळहून धाराशीवकडे जाणारी आकांक्षा ट्रव्हल्सची बस बोर घाटात अचानक पेटली आणि मध्यरात्रीच्या सुमारास जीवघेणा थरार उडाला. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीमध्ये केवळ दैव बलवत्तर म्हणून 35 प्रवासी बालबाल बचावले आहेत. सुदैवाने जीवितहानी टळल्याने सर्वांनीच सुटकेचा निŠश्वास सोडला. या भीषण आगीत स्लीपर बस पूर्णपणे जळाली असून सगळ्या प्रवाशांचे सामानही आगीत जळून खाक झाले आहे. आगीच्या या घटनेनंतर बसचा चालक व सहचालक यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.

शनिवारी रात्री साडेअकराच्या सुमारास परळ येथून 35 प्रवासी घेऊन बस धाराशीवच्या दिशेने निघाली होती. पहाटे दोनच्या सुमारास ही बस मुंबई-पुणे एक्प्रेस वेवरील बोरघाटात खोपोली बायपासजवळ येताच इंजिनमध्ये शॉर्टसर्किट होऊन बसने पेट घेतला. त्यामुळे प्रवासी घाबरले. काहीजण जिवाच्या आकांताने ओरडू लागले. अनेक प्रवासी साखरझोपेत होते. क्षणाक्षणाला आग वाढत होती. पण बसचालक इरफान जहांगीरदार व सहचालक रामेश्वर गवळी यांनी तातडीने प्रसंगावधान राखत 35 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळवले.

प्रवासी बाहेर पडताच काही क्षणामध्ये आकांक्षा ट्रव्हल्सची बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्याचा अक्षरशः कोळसा झाला. आगीचे वृत्त समजताच अग्निशमन दल, आयआरबी देवदूत टीम, टाटा स्टील फायर ब्रिगेड यांनी घटनास्थळी धाव घेतली. आगीतून बचावलेल्या प्रवाशांमध्ये 7 लहान मुले तसेच 12 महिलांचा समावेश आहे. आगीची तीव्रता एवढी भयानक होती की, प्रवाशांचे पिंमती सामान जळून नष्ट झाले. दुपारी चारच्या सुमारास आकांक्षा ट्रव्हल्स पंपनीच्या व्यवस्थापनाने दुसरी पर्याची बस उपलब्ध करून दिली. या बसने प्रवासी धाराशीवकडे रवाना झाले

लहान मुले, महिलांना पोलिसांकडून पाणी, बिस्किटे

बोरघाटातील आगीच्या घटनेतून बचावलेल्या प्रवाशांच्या मदतीला खाकी वर्दी धावून आली. पोलिसांनी लहान मुले तसेच महिलांना पाणी व बिस्किटांचे वाटप केले. तसेच पोलिसांनी सर्व प्रवाशांची काळजी घेतली.