शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हाचे प्रकरण नीट ऐकणार, सुप्रीम कोर्टाने केले स्पष्ट

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह मिंधे गटाला देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे. चुकीच्या पद्धतीने घेतलेल्या या निर्णयाची गंभीर दखल न्यायालयाने घेतली आहे. शिवसेना हे पक्ष नाव आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्हाबाबतचे प्रकरण नीट ऐकणार असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले.

निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी, अशी विनंती शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अमित तिवारी यांनी न्यायालयाला केली. या वेळी न्यायालयाने घटनापीठासमोर 370 कलमासंबंधी सुनावणी सुरू आहे. ती पूर्ण झाल्यावर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधातील याचिकेवर सुनावणी घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी सांगितले.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे ज्येष्ठ विधिज्ञ अमित तिवारी यांनी घटनापीठासमोर सुनावणी सुरू नसेल अशा एखाद्या मोकळय़ा दिवशी या प्रकरणी सुनावणी घ्यावी, अशी विनंती केली. त्यावर या प्रकरणी सविस्तर सुनावणी घेण्याची गरज असून आम्हाला हे सारे प्रकरण नीट ऐकावे लागेल, असे सरन्यायाधीश म्हणाले.

आमदार अपात्रता प्रकरणी लवकरच तारीख

शिवसेना सोडून मिंधे गटात सहभागी झालेल्या 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत विधानसभा अध्यक्षांच्या स्तरावरून तातडीने याबाबत कार्यवाही होताना दिसत नाही. यासंदर्भात मुख्य प्रतोद सुनील प्रभू यांनी दाखल केलेली याचिका तातडीने सुनावणीसाठी घ्यावी, अशी विनंतीही सर्वोच्च न्यायालयात करण्यात आली. ही विनंती मान्य करत लवकरच यासंदर्भातील तारीख देण्यात येईल, असे न्यायालयाने सांगितले.