…तर चांद्रयान 27 ऑगस्टला चंद्रावर उतरवणार, इस्रोनं दिली महत्त्वाची माहिती

23 ऑगस्ट (बुधवार) हा दिवस हिंदुस्थानसाठी ऐतिहासिक दिवस असणार असून जगभराचं लक्षं हिंदुस्थानच्या चांद्र मोहिमेकडे लागलं आहे. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3च्याद्वारे विक्रम लँडर चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरण्याच्या तयारीत आहे. यासाठीचं काउंटडाऊन देखील सुरू झालं आहे. मात्र असं असलं तरी ISRO यंदा कोणतीही जोखीम उचलण्यास तयार नाही. चांद्रयान-2 च्या अनुभवावरून ISRO आता सर्व परिस्थिती लक्षात घेऊनच लँडर उतरवण्याचा निर्णय घेणार आहे.

लँडर उतरवणे योग्य आहे की नाही याचा निर्णय लँडर मॉड्यूलची स्थिती आणि चंद्रावरील परिस्थिती लक्षात घेऊन घेतला जाईल, अशी माहिती अहमदाबाद येथील इस्रोचे स्पेस अॅप्लिकेशन सेंटर संचालक नीलेश एम देसाई यांनी दिली. परिस्थिती अनुकूल नसल्यास लँडिंग 27 ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्याची पर्याय तयार ठेवल्याचं देखील त्यांनी सांगितलं.

‘चांद्रयान-3 चंद्रावर उतरण्याच्या दोन तास आधी 23 ऑगस्ट रोजी, लँडर मॉड्यूलचे प्रकृती आणि चंद्रावरील परिस्थितीच्या आधारे आम्ही त्या वेळी ते उतरवणे योग्य आहे की नाही याचा निर्णय घेऊ’, असं देसाई यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना सांगितलं.

‘कोणताही घटक अनुकूल नसल्याचं दिसलं, तर आम्ही 27 ऑगस्टला हे मॉड्यूल चंद्रावर उतरवू’, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. मात्र सध्या तरी कोणतीही अडचण येऊ नये आणि आम्ही 23 ऑगस्टला हे मॉड्यूल चंद्रावर उतरवू शकू अशीच परिस्थिती असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.