चेंबूरच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ; जेवणात अळय़ा, कालमर्यादा उलटलेली बिस्किटे, कुजलेली फळे

चेंबूर येथील माता रमाई आंबेडकर मुलींचे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या जिवाशी खेळ सुरू आहे. या विद्यार्थ्यांना अत्यंत निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत आहे. मागील काही दिवसांपासून विद्यार्थिनींच्या जेवणात अळ्या सापडल्या होत्या तसेच विद्यार्थ्यांना कालमर्यादा उलटून गेलेली बिस्किटे दिली जात होती. याविरोधात संतप्त विद्यार्थिनींनी नुकतेच अन्नत्याग आंदोलन केले. या आंदोलनाची दखल सामाजिक न्याय विभागानेदेखील घेतली आणि लगेचच भोजन कंत्राटदाराची हकालपट्टीच केली आहे.

चेंबूरमधील दोन्ही वसतिगृहांना जेवण पुरविण्यासाठी क्रिस्टल कंत्राटदाराची नेमणूक सरकारने केली आहे. या कंत्राटदाराकडून निकृष्ट दर्जाचे जेवण मिळत असल्याच्या तक्रारी विद्यार्थिनींनी वॉर्डनकडे केल्या होत्या. कालमर्यादा संपलेली बिस्किटे, कुजलेली फळे, उंदरांच्या लेंडय़ा, जेवणातील भात, डाळ, आमटीमध्ये अळ्या सापडल्याबाबतच्या तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र या तक्रारीची दखलच घेतली गेली नव्हती. अखेर आंबेडकर स्टुडंट असोसिएशनच्या नेतृत्वाखाली येथील माता रमाई आंबेडकर वसतिगृहातील विद्यार्थिनींनी अन्नत्याग आंदोलन केले. वसतिगृहातील मेस कंत्राटदाराकडून गुंडगिरीची भाषा वापरली जात असल्याच्या तक्रारीही विद्यार्थिनींनी केल्या होत्या.

कंत्राटदाराला दंड
विद्यार्थिनींच्या आंदोलनाची माहिती मिळताच सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रसाद खैरणार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास भेट दिली व सध्या चालू असलेला भोजन ठेकेदार बदलून नवीन ठेकेदार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. सामाजिक न्याय विभागाने भोजन कंत्राटदाराला दंड ठोठावला असून आता नवीन कंत्राटदाराची नेमणूक केली जाणार आहे. यापूर्वीही बहुतेक वेळा असे प्रकार सामाजिक न्याय विभागाच्या अनेक वसतिगृहांत घडले आहेत, त्या वेळीही संघटनेने वसतिगृहाच्या आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याबाबत अनेक निवेदन दिली. वेळोवेळी विद्यार्थ्यांच्या न्याय्य हक्कासाठी आवाज उठवला आहे. किंबहुना याविरोधात आंदोलने केली आहेत व न्याय मिळवून दिला आहे, असे आंबेडकर स्टुडंट असोसिएशन, महाराष्ट्रचे अभिनव येलवे यांनी सांगितले.