गुजरात टाय टाय फिस्स; चेन्नईच्या आव्हानापुढे गुजरात नतमस्तक

रचिन रवींद्रच्या 20 चेंडूंतील 46 धावांच्या झंझावातानंतर शिवम दुबेने ठोकलेल्या 23 चेंडूंतील 51 धावांच्या खेळींच्या जोरावर चेन्नईने आपल्याच अंगणात उभारलेल्या द्विशतकी आव्हानासमोर गुजरात टायटन्सने अक्षरशा गुडघे टेकले. गुजरातचा संघ या आव्हानाचा पाठलाग करतोय असे कधीच वाटले नाही आणि त्यांनी 20 षटके फलंदाजी करत 8 बाद 143 धावा केल्या. सलामीला आरसीबीचा सहज पराभव करणाऱ्या चेन्नईने सलग दुसऱ्या सामन्यातही 63 धावांचा मोठा विजय नोंदवत आपली विजयी घोडदौड कायम राखली.

चेन्नईच्या 207 धावांचा पाठलाग करताना कर्णधार शुबमन गिल 8 धावांवर पायचीत झाल्यानंतर गुजरातच्या एकाही फलंदाजाने चेन्नईच्या गोलंदाजीवर हल्ला चढवला नाही. दीपक चहर, मुस्तफिझूर रहमान आणि तुषार देशपांडेने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेत चेन्नईचा विजय आधीच निश्चित केला. फक्त विसाव्या षटकात त्याची औपचारिकता पूर्ण झाली. गुजरातकडून साई सुदर्शनने सर्वाधिक 37 धावा केल्या.

त्याआधी शुबमन गिलने नाणेफेक जिंकली आणि चेन्नईला फलंदाजीचे आमंत्रण धाडले. चेन्नईच्या रचिन रवींद्रने फलंदाजीला उतरल्यावर आपल्या बॅटरूपी आसुडाने गुजरात टायटन्सच्या गोलंदाजांना अक्षरशः फोडून काढले. त्याने आपल्या 20 चेंडूंच्या खेळीत 46 धावा ठोकताना 6 चौकार आणि 3 षटकार खेचत 42 धावा वसूल केल्या. एवढेच नव्हे तर त्याने कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या साथीने 5.2 षटकांत 62 धावांची सलामी दिली.

चेन्नईच्या रचिन रवींद्रपाठोपाठ शिवम दुबेनेही गुजरातच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. चेन्नईच्या चौकार-षटकारांचा स्ट्राईक रेट इतका सुसाट होता की, 20 षटकांच्या सामन्यात त्यांनी 11 षटकार आणि 16 चौकार मारताना 130 धावा पह्डून काढल्या. 5 षटकार दुबेच्या बॅटमधून निघाले.

रचिन बाद झाल्यानंतर चेन्नईच्या धावांचा वेग काहीसा मंदावला. गायकवाडने अजिंक्य रहाणेच्या मदतीने 42 धावांची भागी करत संघाचे शतक फलकावर लावले. रचिनप्रमाणे त्याचेही अर्धशतक 4 धावांनी हुकले. रहाणेची खेळी 12 धावांपेक्षा पुढे जाऊ शकली नाही, मात्र त्यानंतर शिवम दुबेच्या आक्रमक रुपाने चेन्नईकरांचे फुल टू मनोरंजन केले. त्याने 22 व्या चेंडूंतच आपली पन्नाशी साजरी करताना 5 उत्तुंग षटकार आणि 2 चौकार मारले. त्याची बॅट आग ओकत असतानाच तो बाद झाला.