Lok Sabha Election 2024 : मुख्य निवडणूक आयुक्तांना झेड सुरक्षा

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांना झेड सुरक्षा देण्यात आली आहे. गुप्तचर विभागाने या प्रकरणी अहवाल दिला होता. त्यानंतर गृह मंत्रालयाने तातडीने पावले उचलत राजीव कुमार यांची सुरक्षा वाढवण्याच्या सूचना दिल्या. सीआरपीएफ अर्थात केंद्रीय राखीव पोलीस दलाला 40 ते 45 जवानांची तुकडी पुरवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

सीआरपीएफ कमांडोही राजीव यांच्या सुरक्षेसाठी तैनात असणार आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांना केंद्रीय सुरक्षा कवच देण्यात आल्याची ही पहिलीच घटना आहे. माजी मुख्य निवडणूक आयुक्त दिवंगत टी. एन. शेषन यांना एकेकाळी केंद्रीय सुरक्षा कवच देण्यात आले होते. सीआरपीएफ कमांडोसह एकूण 22 सुरक्षा कर्मचारी राजीव कुमार यांच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात येणार आहेत. यात एनएसजी कमांडो आणि पोलिसांचा समावेश असेल. राजीव कुमार यांच्या निवासस्थानी सशस्त्र स्थिर रक्षक, चोवीस तास सुरक्षा देणारे खासगी सुरक्षा अधिकारी आणि तीन शिफ्टमध्ये काम करणारे सशस्त्र एस्कॉर्ट कमांडो असणार आहेत.