Lok Sabha Election 2024 : अजित पवारांच्या वक्तव्याची निवडणूक आयोगाकडून दखल, चौकशीचे आदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढल्या आहेत. एका प्रचारसभेमध्ये अजित पवार यांनी मतदारांना प्रलोभन दाखवणारे विधान केले होते. या विधानाची राज्य निवडणूक आयोगाने दखल घेतली असून चौकशीचे आदेश दिले आहेत.

काय लागेल तो निधी द्यायला सहकार्य करू, पायजेल तेवडा निधी देतो, पण मशीनमध्ये बटण दाबा कचाकचा, म्हणजे मलाही बरे वाटेल. नाही तर माझा हात आखडता होईल, असे विधान इंदापूरमध्ये डॉक्टर आणि वकिलांच्या परिषदेत बोलताना अजित पवार यांनी केले होते.

मतदारांना प्रलोभन दाखवणे हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विधानाची निवडणूक आयोगाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी केली होती. याबाबत विरोधकांकडून तक्रारही दाखल करण्यात आली होती. यानंतर राज्य निवडणूक आयोगाने पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना अजित पवार यांच्या वक्तव्याची चौकशी करण्याचे आणि अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. ‘टाइम्स ऑफ इंडिया’ने याबाबत वृत्त दिले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

अजित पवारांचे स्पष्टीकरण

हा ‘ध’ चा ‘मा’ करण्याचा प्रकार असून मी गंमतीने ते विधान केले होते, असे स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिले आहे. मी नेहमी विचारपूर्वक बोलतो आणि आचारसंहितेची खबरदारी घेतो, असेही ते म्हणाले.

दरम्यान, बारामती मतदारसंघात यंदा पवार कुटुंबातच लढत होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून सुप्रिया सुळे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर त्यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना तिकीट देण्यात आले आहे. गुरुवारी सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांनी उमेदवारी अर्जही दाखल केला. याच दरम्यान अजित पवार यांनीही डमी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत नवा ट्विस्ट आला आहे.

Lok Sabha Election 2024 : खोके सम्राट, पलटुसम्राट परवडत नाही, अमोल कोल्हेंची टीका