आता खटल्यांची माहिती व्हॉट्सअॅपवर देखील उपलब्ध होणार, सरन्यायाधीशांची मोठी घोषणा

देशाचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी एक महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे. सर्वोच्च न्यायालय आता व्हॉटसअॅपच्या माध्यमातून खटल्यांची माहिती उपलब्ध करून देणार आहे. खटल्यांशी संबंधित अधिवक्ते आणि वकील यांना खटल्यासंदर्भातील माहिती व्हॉटसअॅपद्वारेच प्राप्त होणार आहे.

सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील नऊ सदस्यीय पीठासमोर याचिकांतील उत्पन्नाशी संबंधित एका गुंतागुंतीच्या प्रश्नावर सुनावणी सुरू करण्यापूर्वी चंद्रचूड यांनी ही घोषणा केली. याचिकांमधून हा प्रश्न पुढे आला की, संविधानाच्या अनुच्छेद 39 (ब) अंतर्गत वैयक्तिक संपत्ती ही समुदायाची स्थावर मालमत्ता मानली जाऊ शकते का? जो राज्यांच्या नीती निर्देशक सिद्धांताचा एक भाग असेल.

त्यावर उत्तर देताना चंद्रचूड म्हणाले की, देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने एक पाऊल पुढे टाकलं आहे. ज्यात माहिती आणि तंत्रज्ञान सेवांचा समावेश करून व्हॉटसअॅप मेसेज द्वारे न्यायाची प्रक्रिया सुलभ आणि तितकीच मजबूत करण्याचं लक्ष्य ठेवण्यात आलं आहे. वकिलांना खटला दाखल केल्यानंतर मेसेज प्राप्त होतील. खटल्यातील वादसूची प्रकाशित झाल्यानंतर त्याची माहितीही बार काऊन्सिलच्या सदस्यांना मिळेल. वाद सूची म्हणजे सुनावणीचे वेळापत्रक होय. ज्यात ठरलेल्या तारखांना सुनावणीला येणारे खटले आणि त्यांची वेळ नमूद करण्यात येते. हा बदल वेळ आणि कागद यांच्या बचतीसाठी उपयुक्त ठरेल, असं प्रतिपादन चंद्रचूड यांनी केलं आहे.