आधार जन्मतारखेचा पुरावा नाही; हायकोर्टाची पुणे पोलिसांना चपराक

 

आधार कार्ड हा जन्मतारखेचा पुरावा नाही, असे स्पष्ट करत उच्च न्यायालयाने पुणे पोलिसांना चांगलीच चपराक दिली. विशेष म्हणजे, आरोपी अल्पवयीन आहे की नाही याचा शोध पुणे पोलिसांना आधार कार्डवर नमूद असलेल्या जन्मतारखेच्या आधारे घ्यायचा होता. मात्र जन्मतारीख शोधायची असेल तर जन्मदाखला किंवा अन्य कागदपत्रे तपासा. यासाठी आधार कार्डची काय गरज नाही, असे खडे बोलही न्यायालयाने पुणे पोलिसांना सुनावले.

मुळात आधार कार्ड हा वास्तव्याचा पुरावा आहे. त्याचा वापर जन्मतारीख नेमकी कोणती हे निश्चित करण्यासाठी केला जाऊ शकत नाही. आधार कार्ड जन्मतारखेचा पुरावा म्हणून ग्राह्य धरू नये, असे पेंद्र सरकार व सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे, असे नमूद करत न्यायालयाने याचिका फेटाळून लावली.

दोन आधार दोन जन्मतारखा

संदीप लालजी कुमारला पोलिसांनी अटक केली तेव्हा त्याच्याकडे आधार कार्ड होते. त्या आधार कार्डवर त्याची जन्मतारीख 1 जानेवारी 1999 अशी नमूद आहे. त्यानुसार त्याचे वय 21 वर्षे आहे. मात्र पुणे सत्र न्यायालयात सादर केलेल्या आधार कार्डवर जन्मतारीख 5 मार्च 2003 आहे. त्यानुसार तो अल्पवयीन ठरतो.

काय आहे प्रकरण…

पुणे येथील वाकड पोलीस ठाण्यात 16 ऑगस्ट 2020 रोजी संतोष शेषराव अंगरक बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या वडिलांनी नोंदवली. 2 सप्टेंबर 2020 रोजी संतोषचा मृतदेह सापडला. याप्रकरणी पोलिसांनी गणेश पवार, अरविंद घुगे, महेश जगताप व संदीप लालजी कुमार या चौघांना अटक केली. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 363, 364, 302, 201, 120(ब) व अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला.