सरकार टिकवण्यासाठी मिंध्यांच्या बच्चू कडूंना विनवण्या; 17 ला पुन्हा भेट, 18 पर्यंत ‘वेट अँड वॉच’

शिंदे-फडणवीस सरकारमध्ये अजित पवार यांचा गट सहभागी झाल्याने मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाचा तिढा वाढलेला असताना सरकारमध्ये रहायचे की नाही याबाबत गुरुवारी सकाळी 11 वाजता निर्णय घेणार असल्याचे अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी जाहीर केले होते. त्यानुसार त्यांनी पत्रकार परिषदही घेत आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र त्यांची ठोस निर्णय घेण्याची घोषणा ‘फुसका बार’ निघाली असून आपण सरकारमध्येच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याची घोषणाही केली होती मात्र मुख्यमंत्र्यांच्या विनवण्यांनंतर 17 ला त्यांची भेट घेऊन 18 तारखेला काय तो निर्णय घेऊ अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे.

राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असा गोंधळ पाहायला मिळत असून मंत्रिपद, मंत्रिमंडळ विस्तार यावरून रस्सीखेच सुरू आहे. अनेक जण अजित पवार गटाच्या एंट्रीने नाराज आहेत. याच पार्श्वभूमीवर बच्चू कडू काय निर्णय घेतात याकडे सगळ्यांचं लक्षं लागलं होतं. ‘राज्यात सुरू असलेल्या राजकारणानं जनतेत आपली प्रतिमा मलिन होत आहे. लोकं म्हणतात खोक्यांसाठी सत्तेच्यामागे धावाधाव चालली आहे. त्यामुळे लोकांना या सगळ्यांचा विट आला आहे. आम्ही देखील या प्रकाराला कंटाळलो आहोत. त्यामुळे मंत्रिपदाच्या शर्यतीतून बाहेर पडण्याचा निर्णय मी घेत होतो. मात्र त्याच वेळी मुख्यमंत्र्यांनी वारंवार फोन करून विनंती केली आणि 17 तारखेला भेटण्यासाठी वेळ दिली आहे. तोपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नको अशी त्यांची विनंती आहे. त्यामुळे तो निर्णय मी 18 तारखेला घेईन’, असं बच्चू कडू म्हणाले.

शिंदेंचा गुलाम राहिन!

मिंधे सरकारमध्ये सहभागी होतानाचा प्रसंग सांगताना ते म्हणाले की, ‘शिंदेंसोबत जाताना त्यांना मी दिव्यांग मंत्रालयाची मागणी केली होती ती मागणी त्यांनी सरकार आल्यानंतर पूर्ण केली. त्यासाठी आपण त्यांचे आभारी आहोत, या गोष्टीसाठी त्यांचा आयुष्यभर ऋणी राहिन’. यापुढे ‘त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यात गुलाम म्हणून काम करेन’, असं विधान बच्चू कडू यांनी केलं.

महाराष्ट्रातील नेत्यांचा दिल्लीत हायकमांडसमोर मुजरा! मंत्रिमंडळ विस्तार म्हणजे असंतोषाचा भडका!! – संजय राऊत

उद्धव साहेब दिलेल्या शब्दावर ठाम राहिले, बच्च कडूंनी मानले आभार!

आज झालेल्या पत्रकार परिषदेवेळी बच्चू कडू यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उद्धव ठाकरे यांचे आभार मानत सुरुवात केली. उद्धव ठाकरे दिलेला शब्द पाळतात याची जणू त्यांनी मिंधे-फडणवीस सरकारला आठवण करू दिली. ते म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांचे आभार मानतो. महाविकास आघाडीच्या सत्ता स्थापनेवेळी त्यांना आमच्या दोन आमदारांच्या पाठिंब्याची गरज होती आणि आम्ही त्यांना पाठिंबा दिल्यानंतर आम्हाला वेगवेगळ्या पक्षांनी आमिष दाखवले. पण आम्ही ठाम राहिलो, उद्धव साहेबही ठाम राहिले. त्यांनी आम्हला दिलेला शब्द पाळला आणि मी राज्यमंत्रीही झालो. यासाठी मी त्यांचे आभार मानतो’.