Pepperfry कंपनीच्या सहसंस्थापकाचा लेहमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

पेपरफ्राय कंपनीचे सहसंस्थापक अंबरीश मूर्ती यांचे अकस्मात निधन झाले आहे. पेपरफ्राय कंपनी ही ऑनलाई फर्निचर आणि घरसजावटीचे सामान विकणारी कंपनी आहे. या कंपनीचे दुसरे सहसंस्थापक आशिष शहा यांनी मूर्ती यांच्या निधनाची वार्ता दिली आहे. शहा यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, “माझे मित्र, सल्लागार, बंधू अंबरीश मूर्ती यांना लेहमध्ये हृदयविकाराचा झटका आला. यामध्ये त्यांचे निधन झाले आहे. “मूर्ती यांना बाईकवरून फिरायची आवड होती आणि ते मुंबई ते लेह असे बाईकवरून प्रवास करत होते. मूर्ती यांनी पेपरफ्रायची 2011 साली स्थापना केली होती. ते या कंपनीचे सीईओ होते. मूर्ती यांच्या निधनाचे वृत्त कळताच त्यांना अनेकांनी आदरांजली वाहिली असून त्यांच्या आठवणी जागवण्यास सुरुवात झाली आहे.

मूर्ती यांनी कलकत्यातील आयआयएममधून 1996 साली एमबीए केलं होतं. उद्योजक बनण्याचं स्वप्न हे त्यांनी तरुणपणीच बाळगलं होतं. शिकत असताना त्यांनी घरीच क्लासेस घ्यायला सुरुवात केली होती. यासाठी त्यांनी ट्युटर्स ब्युरो नावाचा लहानसा व्यवसाय सुरू केला होता. याद्वारे ते सगळे शिक्षक आणि विद्यार्थी यांना जोडण्याचा प्रयत्न करत होते. हा व्यवसाय त्यांनी 1990 साली सुरू केला होता आणि तो 2 वर्ष चालवला.