ठाण्यात भाडोत्री गर्दीने म्हस्केंना ‘तुडवले’; जेवणाच्या पाकिटांसाठी फोटो पायदळी; व्हिडीओ तुफान व्हायरल

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नरेश म्हस्के यांनी शुक्रवारी भाडोत्री गर्दी जमवत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोटात कावळे ओरडू लागल्याने जेवण दिसताच झुंबड करत विकतच्या कार्यकर्त्यांनी थेट गळ्यातील मिंध्यांचे उपरणे आणि झेंडे रस्त्यावर टाकलेच, पण काही जणांनी तर थेट नरेश म्हस्के यांचे पोस्टर ‘तुडवत’ पोटाची आग शांत केली. म्हस्केंना ‘तुडवल्या’चा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला असून मिंधेंच्या नकली कारभाराचा बुरखा फाटला आहे.

नरेश म्हस्के यांची ठाण्यातून उमेदवारी जाहीर होताच मिंधे गटासह भाजपमधील अनेक नेत्यांनी संताप व्यक्त करत नाराजी व्यक्त केली. नवी मुंबईत तर गणेश नाईक समर्थकांनी म्हस्के यांच्यासमोरच राडा केला. त्यामुळे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करताना नरेश म्हस्के यांनी भाडोत्री गर्दी जमवत शक्तिप्रदर्शन करण्याचा प्रयत्न केला. थेट नाशिक, मालेगावमधूनही लोकांना आणण्यात आले. दुपारी अर्ज भरल्यानंतर टेम्पोमधून आणलेली अन्नाची पाकिटे कार्यकर्त्यांना देण्यास सुरुवात केली. कार्यकर्त्य अक्षरशः रेटारेटी करत जेवणाच्या पाकिटावर तुटून पडले. या गोंधळात मिंधे गटाचे नाव व चिन्ह असलेले उपरणे तसेच नरेश म्हस्के यांचे कटआऊट असलेले फोटो पायदळी तुडवण्यात आले.

निष्ठा गहाण ठेवल्यानेच ही अवस्था
सत्ता आणि पैशांसाठी शिवसेनेशी गद्दारी करून मिंधे खोके सरकारमध्ये सहभागी झाले. त्यामुळे मिंधे गटाच्या सभांमध्ये गर्दी कमी आणि रिकाम्या खुर्य्या जास्त अशी अवस्था असून याचा तडाखा लोकसभा निवडणुकीत त्यांना बसेल अशी चर्चा आहे. निष्ठावंत कार्यकर्ते नसल्याने म्हस्के यांनादेखील भाडोत्री गर्दी जमवावी लागली. त्यातूनच ही अवस्था झाल्याची टीका ठाणेकरांनी केली आहे.