ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रूममध्ये घुसखोरी; महाविकास आघाडीच्या उमेदवारांची मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रार

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान 20 मे रोजी झाले. त्यानंतर ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट यंत्रे निवडणूक आयोगाच्या देखरेखीखाली स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आली आहेत, परंतु कडक सुरक्षा व्यवस्था भेदून या स्ट्राँग रूममध्ये घुसखोरी होत आहे. नाशिक आणि नगर लोकसभा मतदारसंघात असे प्रकार घडल्याचे समोर आले आहे. त्यासंदर्भात नाशिक आणि नगरमधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे तक्रार करून कारवाईची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी जाहीर केला जाणार आहे. तोपर्यंत ईव्हीएम मशीन्स आणि व्हीव्हीपॅट यंत्रे स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात येणार आहेत. या स्ट्राँग रूमबाहेर पोलिसांचा कडक पहारा असतो. त्यानंतरही तांत्रिक दोष दुरुस्त करण्याच्या नावाखाली तंत्रज्ञांकडून स्ट्राँग रूममध्येही घुसखोरी केली जात आहे.

शिवसेनेचे नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवार राजाभाऊ वाजे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर दक्षिण लोकसभेतील उमेदवार नीलेश लंके यांच्या मतदारसंघांमध्ये अशा घटना समोर आल्या. त्यानंतर वाजे आणि लंके यांनी मुख्य निवडणूक अधिकाऱयांकडे त्यासंदर्भात तक्रार केली असल्याची माहिती शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद आहे.

लोकशाही चोरून नेण्याचा प्रयत्न होतोय – नीलेश लंके

नीलेश लंके यांनी ट्विट करूनही या घुसखोरीबद्दल माहिती दिली आहे. नगर दक्षिण मतदारसंघातील अहिल्यानगर येथे ईव्हीएम ठेवलेल्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा भेदून एका इसमाने ईव्हीएममध्ये बिघाड करण्याचा प्रयत्न केला. सीसीटीव्हीमध्ये ते उघड झाले. आपले सहकारी अशी चोरी पकडू शकतात. मग सुरक्षा यंत्रणा त्या इसमाला का रोखू शकली नाही? असा सवाल लंके यांनी ट्विटमध्ये केला आहे. पुंपणच शेत खात असून लोकशाही चोरून नेण्याचा प्रयत्न होत असतानाही प्रशासन उघडय़ा डोळ्यांनी पाहतेय, असेही त्यांनी नमूद केले आहे.

मतमोजणी केंद्रांवर जॅमर बसवा – राजाभाऊ वाजे

मतमोजणी केंद्रांवर जॅमर बसवण्यात यावेत अशी मागणीही नाशिक लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱयांकडे केली आहे. मतदान करताना मतदारांना जशी मोबाईल पह्न आणण्यास मनाई करण्यात आली होती तशीच मनाई मतमोजणीच्या दिवशी सर्वांनाच करण्यात यावी आणि मतमोजणी सुरू होण्याच्या 24 तास आधीच मतमोजणी केंद्रांच्या परिसरात सर्व मोबाईल कंपन्यांचे नेटवर्क, ब्लू टूथ नेटवर्क किवा वायफाय नेटवर्क तसेच इतर कुठल्याही भ्रमणलहरी फ्रिक्वेन्सी नसाव्यात म्हणून स्ट्राँग जॅमर बसवण्यात यावेत, असे वाजे यांनी म्हटले आहे.

हलगर्जी करणाऱया सुरक्षा अधिकाऱयांवर कारवाई करा

‘मुक्त आणि पारदर्शक निवडणुका’ हे निवडणूक आयोगाचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे अशा घटना घडणे आयोगाला भूषणावह नसून याप्रकरणी संबंधित निवडणूक अधिकारी व सुरक्षा अधिकाऱयांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी या तक्रारींमध्ये करण्यात आली आहे.

उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष बिघाड दुरुस्ती करा

स्ट्राँग रूममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्याची कल्पना संबंधित मतदारसंघातील सर्व उमेदवारांना देण्यात यावी आणि त्यांच्या निवडणूक प्रतिनिधींच्या उपस्थितीतच तंत्रज्ञांना स्ट्राँग रूममध्ये प्रवेश देण्यात यावा अशी मागणीही करण्यात आल्याचे प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.