कोकण रेल्वेत घुसखोरी; कोकणकन्यात चाकरमान्यांचा उभे राहून प्रवास, प्रवाशांमध्ये संताप

विकेंडला लागून आलेल्या सुट्टय़ांमुळे मुंबईकरांनी कोकणबरोबरच गोव्याची वाट धरली आहे. मात्र मुंबई-गोवा महामार्ग पुरता खड्डय़ात गेल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रवासाला पंसती दिली आहे. त्यामुळे शुक्रवारपासून कोकणात जाणाऱया रेल्वे गाडय़ांना झालेली गर्दी पाहता घुसखोरी झाल्याचे दिसत आहे. शनिवारी रात्री कोकणकन्या सुपरफास्ट एक्प्रेमध्ये पाय ठेवायलाही जागा नव्हती. नॉन एसी स्लीपर कोचमध्ये दीडशे ते दोनशे प्रवासी होते. अनेकांनी उभा राहून प्रवास केला. त्यातच गाडी सिंधुदुर्ग, सावंतवाडीला तब्बल अडीच तास विलंबाने पोहचल्याने प्रवासी संताप व्यक्त करत होते.

शासकीय कार्यालयांबरोबरच अनेक खासगी कार्यालयांतील कर्मचाऱयाना शनिवार, रविवरची सुट्टी आहे. मंगळवारी स्वातंत्र्य दिन आणि बुधवारी पारसी नूतन वर्षाची अशा जोडून सुट्टय़ा आल्याने अनेकांनी सोमवारची एक दिवसाची सुट्टी टाकत कुटुंबकबिल्यासह देवदर्शनाबरोबरच पर्यटनाकडे मोर्चा वळवला आहे. त्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य दिले आहे. शनिवारी रात्री 11.05 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून वेळेत सुटलेली कोकणकन्या एक्प्रेस ही गाडी सिंधुदुर्गला सकाळी आठच्या सुमारास पोहोचणे अपेक्षित होते, मात्र गाडीला अडीच तासांचा विलंब झाल्याने प्रवाशांची मोठी लटकंती झाली. दरम्यान, 22 कोचच्या या गाडीला नॉन एसी स्लीपरचे 9 कोच आहेत. या सर्व डब्यांत मोठय़ा प्रमाणात गर्दी होती. एका बाकावर सहा-सहा प्रवासी बसले होते.