Corona JN.1 Variant चंदीगडमध्येही मास्कसक्ती, भाजपच्या नगरसेवकाला कोरोनाची लागण

कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून देशभरात रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत आहे. देशात कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन-1 चा पहिला रुग्ण 8 डिसेंबर रोजी आढळला होता. केरळमध्ये आढळलेला नवा व्हेरिएंट जीएन-1 मुळे ही रुग्णवाढ झाल्याचे सांगितले जात आहे. केरळमध्ये एकाच दिवसात तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कर्नाटक सरकारने गर्दीच्या ठिकाणी मास्कसक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. चंदीगडमधील स्थानिक प्रशासनानेही हा निर्णय घेतला असून सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क घालावा असे आवाहन करण्यात आले आहे. उत्तर प्रदेशातील गाजियाबादमधील भाजपचे नगरसेवक अमित त्यागी यांना कोरोनाची लागण झाली आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी बुधवारी सगळ्या राज्यांची एक बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी सगळ्या राज्य सरकारांना सतर्क राहण्याचे आदेश दिले होते. कोरोनाच्या जेएन-1 या नव्या सब व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केला आहे. ठाण्यात आणि सिंधुदुर्गात कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा प्रत्येकी एक रुग्ण आढळला असून आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

केरळपाठोपाठ आता महाराष्ट्रातदेखील कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात ओमायक्रॉनचा जेएन वनचा नवीन व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. 19 वर्षीय तरुणीला नव्या व्हेरिएंटची लागण झाल्याने तिच्यावर कळवा रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या तरुणीला मंगळवारी दुपारी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या या तरुणीची प्रकृती अत्यंत नाजूक असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गातही कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचा रुग्ण आढळला आहे. येथील एका 41 वर्षीय पुरुषाला या व्हेरिएंटची लागण झाली आहे.