COVID-19 JN.1 Variant – 41 देशांमध्ये पसरलाय हिंदुस्थानात सापडलेला कोरोनाचा नवा व्हेरियंट, किती धोकादायक?

देशात पुन्हा कोरोना रुग्णांचा चढता आलेख पहायला मिळत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी देशात 594 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा 2311 वर पोहोचला आहे. यामुळे केंद्र सरकार अलर्ट झाले असून सर्व राज्यांना स्रिनिंग वाढवण्याचे आणि इन्फ्लुएंजा सारख्या गंभीर श्वसन रोगांची माहिती देण्यास सांगितले आहे. यासर आरटीपीसीआर चाचण्या वाढवण्यास आणि पॉझिटिव्ह रुग्णांचे आकडे जमा करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

हिंदुस्थानमध्ये कोरोनाचा नवा सब व्हेरियंट JN.1 सापडल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारं अलर्ट झाली आहेत. सध्या नव्या व्हेरियंटचे देशात 21 रुग्ण आहेत. जगभरामध्ये हा व्हेरियंट वेगाने पसरत असल्याने जागतिक आरोग्य संघटनेनेही याची दखल घेतली असून JN.1 व्हेरियंटला ‘व्हेरियंट ऑफ इंटरेस्ट’ या श्रेणीमध्ये ठेवले आहे. JN.1 व्हेरियंटमुळे कोरोना रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. ज्या देशांमध्ये थंडी पडते तिथे रुग्णसंख्या जास्त असू शकते, असे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे.

दरम्यान, JN.1 व्हेरियंट हिंदुस्थानसह 41 देशांमध्ये पसरला आहे. या नव्या व्हेरियंटचे सर्वाधिक रुग्ण फ्रान्स, यूएसए, सिंगापूर, कॅनडा, ब्रिटन आणि स्वीडनमध्ये आहेत. हा व्हेरियंट किती धोकादायक आहे याबाबतही तज्ज्ञांनी माहिती दिली आहे.

JN.1 व्हेरियंटचा पहिला रुग्ण ऑगस्टमध्ये समोर आला होता. ओमिक्रॉनचा सब व्हेरियंट BA.2.86 या श्रेणीतील हा व्हेरियंट आहे. JN.1 व्हेरियंट हा ओमिक्रॉनच्या सब व्हेरियंटमधील अधिक धोकादायक व्हेरियंट आहे, असे समोर आले आहे. त्यामुळे हा व्हेरियंट वेगाने पसरत आहे. JN.1 व्हेरियंटच्या स्पाईक प्रोटीनमध्ये एक अतिरिक्त म्युटेशन आहे आणि हा प्रतिकारशक्तीला चकवा देऊन संक्रमित करू शकतो. यामुळे तो वेगाने पसरू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. मात्र अद्याप या व्हेरियंटच्या लक्षणांबाबत अधिक माहिती मिळालेली नाही.

कोरोना आला! पालिका अ‍ॅलर्ट मोडवर

दरम्यान, हिंदुस्थानातील बहुतांश लोकांनी ओमिक्रॉन व्हेरियंटचा सामना केलेला आहे. तसेच ओमिक्रॉनच्या सब व्हेरियंटचाही सामना केलेला आहे. कोरोनाची लसही घेतलेली आहे. त्यामुळे JN.1 व्हेरियंटचा जास्त धोका नसेल, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.

कोरोनाची सामान्य लक्षणं – नाक वाहतंय, ताप, खोकला, डोकेदुखी, घशात खवखव, मळमळ, उलटी, जुलाब, थंडी वाजणे, श्वास घेण्यास अडचण, तोंडाची चव जाणे, गंध न येणे.

काय काळजी घ्याल?

– गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करा
– खोकताना, शिंकताना तोंड आणि नाकासमोर रुमाल धरा, त्यानंतर हात स्वच्छ धुवा किंवा सॅनेटाईज करा