दिवंगत कलाकारांना वाहणार स्वरांजली; दादर-माटुंगा कल्चरल सेंटरमध्ये शास्त्रीय गायनाचा कार्यक्रम

दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवंगत कलाकारांना स्वरांजली वाहण्यासाठी कलाकार दिन साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने गोमांतक मराठा समाजाच्या वतीने येत्या रविवारी दादर-माटुंगा कल्चरल सेंटर येथे शास्त्रीय गायनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 10 ते दुपारी 2 यावेळेत रसिक श्रोत्यांना या कार्यक्रमांचा आनंद घेता येणार आहे.

गोव्यातील शास्त्रीय गायक पंडित कमलाकर नाईक आणि डॉ. अरुण द्रविड हे त्यांच्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करतील. पंडित कमलाकर नाईक हे पंडित रत्नकांत रामनाथकर, व्ही. आर. आठवले, बबन हळदणकर, उस्ताद अल्सम खान आणि पंडित जितेंद्र अभिषेकी यांचे शिष्य आहेत तर डॉ. अरुण द्रविड हे गानसरस्वती, ‘पद्मविभूषण’ किशोरी आमोणकर यांचे ज्येष्ठ शिष्य आहेत. दोघांना तबल्यावर यती भागवत तर हार्मोनियमसाठी निरंजन लेले हे साथसंगत करतील. यावेळी डॉ. अरुण द्रविड आणि पंडित कमलाकर नाईक यांचा सत्कार सोहळाही होणार आहे. निवेदन मृणाल निरंजन पर्वतकर यांचे असणार आहे.