हिंडेनबर्गचे अदानी समूहावरील आरोप गैरलागू, अमेरिकन अधिकाऱ्याचा दावा

gautam-adani

श्रीलंकेतील कन्टेनर टर्मिनलच्या उभारणीसाठी अदानी समूहाने अमेरिकेच्या डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प या संस्थेकडून कर्ज घेतलं आहे. हिंडेनबर्ग अहवालातील आरोप हे गैरलागू आहेत, त्यांचा या व्यवहारांशी संबंध नाही, असा दावा डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प या संस्थेच्या एका अधिकाऱ्याने केला आहे. तरीही अदानी समूहाच्या पुढील व्यवहारांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे, असंही या अधिकाऱ्याने म्हटलं आहे.

हिंडेनबर्गकडून अदानी समूहावर करण्यात आलेले आरोप या कर्जाच्या व्यवहारासंदर्भात गैरलागू होते, असा दावाही या अधिकाऱ्याने केला आहे. हा अधिकारी डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प या अमेरिकन संस्थेत काम करत असून याच संस्थेच्या अहवालात अदानी समूहावर झालेल्या आरोपांची चौकशी करण्यात आल्याचाही उल्लेख करण्यात आला आहे.

हा अहवाल ब्लूमबर्गने प्रकाशित केला आहे. डेव्हलपमेंट फायनान्स कॉर्प (डीएफसी) या संस्थेने अदानी समूहाला श्रीलंकेतील कन्टेनर टर्मिनलच्या उभारणीसाठी 55.3 कोटी अमेरिकन डॉलर्सचं कर्ज दिलं होतं. त्यापूर्वी अदानी समूहावर हिंडेनबर्गकडून आर्थिक अफरातफरीचे आरोप करण्यात आले होते. त्यामुळे कर्ज देण्यापूर्वी डीएफसीकडून अदानी समूहावर झालेल्या आरोपांविषयी सखोल तपास करण्यात आल्याचा दावा डीएफसीच्याच एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर केला आहे.

हिंडेनबर्ग अहवालात करण्यात आलेल्या आरोपांचा संबंध न आढळल्याने या कर्जाला मंजुरी देण्यात आली. तरीही डीएफसी वारंवार कंपनीच्या व्यवहारांवर नजर ठेवणार आहे. कारण अशा प्रकारच्या कोणत्याही कंपनीला कर्ज देऊन आपली जागतिक पातळीवरील पत कमी करण्याची डीएफसीची इच्छा नसल्याचंही अधिकाऱ्याचं म्हणणं आहे.