आम्ही अदानींवर टीका केली तर चमचे का वाजू लागतात? उद्धव ठाकरे यांचा घणाघात

धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारने अदानींना आंदण दिला. आम्ही त्याविरुद्ध मोर्चा काढत अदानींवर टीका केली तर चमचे का वाजू लागतात, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज अदानीधार्जिण्या भाजप आणि मिंधे सरकारवर केला. आम्हाला अर्धवट माहितीवर प्रश्न विचारू नका. तुम्ही घेतलेल्या शालींचे वजन तुम्हाला पेलतेय की नाही ते आधी बघा, असा सणसणीत टोलाही त्यांनी धारावीच्या मोर्चावर टीका करणाऱ्यांना लगावला.

उद्धव ठाकरे यांनी आज नागपूर येथे हिवाळी अधिवेशनात विधान परिषदेच्या कामकाजात सहभाग घेतला. त्यानंतर विधान भवन परिसरात त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी प्रसारमाध्यमांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी सडेतोड उत्तरे दिली. धारावीसाठी काढलेल्या मोर्चात धारावीची माणसे नव्हती, असा आरोप सत्ताधाऱ्यांकडून होतोय याबद्दल माध्यमांनी उद्धव ठाकरे यांना यावेळी विचारले. त्याला उत्तर देताना, धारावीच्या विकासासाठी, धारावीकरांच्या न्याय्य हक्कांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो. आता पंतप्रधान मोदी यांनी चंद्रावरून वाहतूक सुरू केली आहे. तिथून ही मोर्चाला माणसे आणली होती, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

धारावी आणि मुंबईच्या प्रश्नांवर बोला ना. मोर्चातील माणसे कुठली होती याचा संबंध काय. मुंबई विकण्यासाठी अदानींची चमचेगिरी करणाऱ्यांची लाज वाटते, असा संतापही उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. भाजप त्या मोर्चात असती तर निश्चितच सेटलमेंट झाले असते, अशा शब्दांतही त्यांनी फटकारले.

…तोपर्यंत सरकार टिकले तर जुनी पेन्शन मिळेल

सरकारी कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्याबाबतचा निर्णय पुढील अधिवेशनात घेतला जाईल असे आश्वासन मिंधे सरकारने दिले आहे. पण तोपर्यंत हे सरकार टिकले पाहिजे, अशी खिल्ली उद्धव ठाकरे यांनी उडवली.

नागपूरमधील स्फोट हा देशाच्या सुरक्षेचा विषय

नागपूरमध्ये झालेल्या स्पह्टातील मृतांनाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी श्रद्धांजली वाहिली. हा देशाच्या सुरक्षेचा विषय आहे. देशातील अशा महत्त्वाच्या पंपनीमध्ये स्पह्ट होणे ही गंभीर बाब आहे. नशीब, अधिवेशनात आम्हाला याबाबत बोलू दिले. आता या मुद्दय़ावर सविस्तर चर्चा होईल तेव्हाच हा अपघात होता की घातपात, सुरक्षाविषयक बाबींकडे लक्ष दिले जात होते की नाही हे स्पष्ट होईल, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

…तेव्हाच शंका आली होती की, सरकारला अधिवेशन भरकटवायचेय

नागपुरात अधिवेशन घेतले जाते तेव्हा राज्यासह विदर्भाच्या प्रश्नावरही चर्चा होण्याची गरज असते. मात्र अधिवेशनाची सुरुवातच एसआयटी लावा, हे लावा, ते लावा अशी करण्यात आली, त्यावेळेलाच सरकारला अधिवेशन भरकटवायचे असल्याची शंकेची पाल मनात चुकचुकली होती, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला.

प्रफुल्ल पटेल आता भाजपला जवळचे वाटायला लागले आहेत. वाटेल त्यांना आत टाकायचे आणि भाजपात गेले की बाहेर काढायचे असे चालले आहे. एवढा निर्लज्ज, उघडानागडा कारभार याआधी राज्यात कधीही नव्हता.

मराठा आरक्षणाला आमचा पाठिंबा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी शपथ घेणाऱ्यांनी कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण कसे देणार हे सांगायला हवे!

 सरकारच्या मनात आले म्हणू लावा एसआयटी, करा चौकशी असे सुरू आहे. पीकविमा पंपन्या सरकारी आदेश धाब्यावर बसवतात. शेतकऱ्यांना फसवतात. पीक विमा पंपन्यांच्या कारभाराबाबत एसआयटी का लावत नाही?

आता त्यांना मिर्ची गोड लागतेय

नवाब मलिक, प्रफुल्ल पटेल आणि इक्बाल मिर्ची यावरूनही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सरकारला घेरले. देशद्रोहाचा आरोप असलेला व्यक्ती सत्तेत आपल्यासोबत नको, असे नवाब मलिकांबाबत उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याने आमचा ऊर अभिमानाने भरून आला होता; पण आता माफिया इक्बाल मिर्चीबरोबर व्यवहार करणाऱ्या प्रफुल्ल पटेलांचे काय यावर अजूनही उत्तर मिळालेले नाही, आता त्यांना मिर्ची गोड लागतेय, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी हाणला.

त्या लग्नाला मंत्री महाजनांच्या उपस्थितीबाबत चौकशी करा

प्रफुल्ल पटेलांच्या विषयावर उत्तर आले नाही. मात्र, आज उपमुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन दाऊदच्या हस्तकाच्या लग्नसोहळय़ाला गेल्याप्रकरणी ज्या तत्परतेने खुलासा केला, ती तत्परता खरेच धन्य आहे. राज्य कोण चालवतेय असा प्रश्न पडतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आम्ही सत्तेत असताना आमच्यासोबत होते म्हणून आमच्यावर आरोप करत होते. आता तेच त्यांच्यासोबत मांडीला मांडी लावून बसत आहेत. आता तेच शेण खात आहेत. चर्चा करण्यापेक्षा एका निवेदनात विषय दडपून टाकण्याचा प्रयत्न करत आहेत. त्या लग्नाला महाजन होते की नाही याची चौकशी तर करा. मात्र, तपास, चौकशी करण्याऐवजी ते थेट निकाल घेऊनच आले, अशी टीकाही उद्धव ठाकरे यांनी केली.

मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना दमदाटी करून गुजरातला नेत आहेत

मुंबईतील उद्योग, हिरे व्यवसाय सुरतला पळवले जात असल्याबद्दलचा प्रश्न यावेळी माध्यमांनी उपस्थित केला. त्यावर, मुंबईतील हिरे व्यापाऱ्यांना मोदी दमदाटी करून सुरतला नेत आहेत, मुंबईच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान करत आहेत, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला. गुजरातचा विकास झाला तर देशाचा विकास होईल असे म्हणणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचा विचार करायला हवा.  त्यांना असे विधान शोभत नाही. ते देशाचे पंतप्रधान आहेत की गुजरातचे मुख्यमंत्री, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला.

पुरावे असूनही महाजनांविरुद्ध कारवाई का नाही?

दुरान्वयेही कोणाचा कशाशीही संबंध नसताना एसआयटी चौकशी लावण्यात येते. मग मंत्री गिरीश महाजनांबद्दल आम्ही दिलेल्या पुराव्यांची दखल घेत, चौकशी  का केली जात नाही? आरोपांचा अभ्यास करून उपमुख्यमंत्र्यांनी यावर निवेदन दिले असते तर बरे झाले असते, असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबईला संपवण्याचा डाव

मुंबईतले सगळे उद्योग गुजरातला नेऊन मुंबईला खतम करण्याचे भाजपचे कारस्थान आहे. फॉक्सकॉन असेल, आता हिरे व्यापार असेल… मुंबई आणि महाराष्ट्रातलं सगळं काही तुम्ही तुमच्या गावात नेणार असाल तर बाकीच्यांनी काय करायचं, असा खरमरीत सवाल उद्धव ठाकरे यांनी  मोदींना केला. पळपुटे गद्दारही येथून पळून सुरतलाच गेले होते. तिकडेच सगळं पळवून नेताहेत, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

गिरीश महाजन दाऊदच्या निकटवर्तीयाच्या लग्नात

1993 मधील मुंबई बॉम्बस्पह्टांचा सूत्रधार दाऊद इब्राहिमच्या निकटवर्तीयाच्या लग्नाला मंत्री गिरीश महाजन हे उपस्थित होते. त्या लग्न सोहळ्याचे फोटोच आज विरोधी पक्षाच्या सदस्यांनी विधान परिषदेत झळकावले.