पुनर्विकासाच्या नावाखाली धारावीची लूट थांबवा; नोटिफिकेशनची आज होळी

धारावी पुनर्विकासाच्या नावाखाली विविध सवलतींची बरसात करून धारावी परस्पर अदानी समूहाला विकणाऱया राज्यातील मिंधे सरकारविरोधात आता धारावी बचाव आंदोलनाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. धारावीची लूट करण्यासाठी मिंधे सरकारने काढलेल्या जीआर आणि नोटिफिकेशनची उद्या, मंगळवार, 21 नोव्हेंबरला जाहीर होळी करून निषेध व्यक्त केला जाणार आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला धारावी पुनर्विकास प्रकल्पाचे काम राज्य सरकारने अदानी समूहाला देण्यास मान्यता दिली आहे. सरकारने यासंबंधीचा जीआर आणि नोटिफिकेशनही जाहीर केले आहे.

पुनर्वसनावेळी इमारत आणि सर्वेक्षण ही दोन्ही कामे एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहेत. स्पर्धा डावलून तसेच हिंडेनबर्ग अहवालाने घोटाळेबाज अदानीचा खरा चेहरा समोर आल्यानंतरही केवळ अदानी समूहाला फायदा व्हावा म्हणून धारावी प्रकल्प राज्य सरकारने अदानीच्या घशात घातला आहे. अशा घोटाळेबाज माणसाच्या हाती 12 लाख धारावीकरांचे भवितव्य सोपवू नका. धारावीची लूट करण्याचा परवाना देणारा जीआर आणि नोटिफिकेशन तत्काळ रद्द करा आणि सरकारने स्वतः धारावीचा पुनर्विकास करावा, अशी मागणी धारावी बचाव आंदोलन सदस्यांनी वारंवार केली जात आहे, मात्र मिंधे सरकार धारावीकरांचे ऐकण्याच्या मनःस्थितीत नाही.

अदानीला ‘टीडीआर’ कुठेही वापरण्याची खुली सूट
राज्य सरकारने धारावी पुनर्विकास प्रकल्पातून तयार होणाऱया ‘स्लम टीडीआर’वरील ‘इण्डेक्सेशन’ काढून टाकून तो मुंबईत कुठेही वापरण्याची परवानगी अदानी समूहाला दिली आहे. असे करू देणे म्हणजे बेटांचे शहर असलेल्या मुंबई शहराला जलसमाधी देण्यासमान धोकादायक प्रकार आहे. मुंबईतील विकासकांना आवश्यक असलेल्या टीडीआरपैकी 40 टक्के टीडीआर अदानीकडून प्राधान्याने घेण्याची सक्ती करणे म्हणजे मुंबईतील बांधकाम व्यवसायाची मक्तेदारी एकटय़ा अदानीला बहाल करण्यासारखे आहे, असा आरोप धारावी बचाव आंदोलनाचे समन्वयक डॉ. राजेंद्र कोरडे यांनी केला आहे.

येथे होणार जाहीर होळी
मंगळवार, 21 नोव्हेंबरला सायंकाळी 5 वाजता धारावी मेन रोडवरील धारावी कोळीवाडा येथील होळी मैदानात जीआर आणि नोटिफिकेशनची होळी केली जाणार आहे.