मराठा आरक्षणाच्या मुद्दय़ावरून ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी; भुजबळांचा 2 फेब्रुवारी तर वडेट्टीवारांचा 20 फेब्रुवारीला मेळावा

मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये दुफळी निर्माण झाली आहे. अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यामध्ये ओबीसींचा हीरो बनण्यासाठी चढाओढ सुरू आहे. या अधिसूचनेनंतर भुजबळ यांनी आपल्या निवासस्थानी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावून 2 फेब्रुवारीला महामेळाव्याची हाक दिली, तर आज वडेट्टीवार यांनी ओबीसी नेत्यांची बैठक बोलावून 20 फेब्रुवारीला संभाजीनगरमध्ये ओबीसींची विराट सभा घेण्याची घोषणा केली.

राज्य सरकारने मनोज जरांगे-पाटील यांना मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना दिल्यापासून ओबीसी नेत्यांकडून वेगवेगळय़ा प्रतिक्रिया उमटत आहेत. छगन भुजबळ यांनी त्या अधिसूचनेतील ‘सगेसोयरे’ या शब्दावरच आक्षेप घेऊन ओबीसी बांधवांनी मोठय़ा प्रमाणात या अधिसूचनेवर हरकती नोंदवाव्यात असे आवाहन केले. विजय वडेट्टीवार यांनीही आज ओबीसी नेत्यांची बैठक बोलवली. मंत्रिमंडळाला विश्वासात न घेता मराठा समाजाचा नेता म्हणून मिरवण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी ही मराठा आरक्षणाबाबतची अधिसूचना काढल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. संभाजीनगर येथे 20 फेब्रुवारीला ओबीसींची विराट सभा होणार आहे. सभेपूर्वी येत्या 5 फेब्रुवारीपासून राज्यातील शक्तिस्थळांना भेट देऊन आम्ही स्फूर्ती घेणार आहोत आणि त्याची सुरुवात चैत्यभूमीपासून होणार आहे, अशी घोषणा यावेळी वडेट्टीवार यांनी केली.