डॉक्टर, नर्सेसच्या दुर्लक्षामुळेच माझी आई गेली; ललिताबाई चव्हाण यांच्या नातेवाईकांचा आरोप

उलटी, जुलाब झाले म्हणून आईला कळवा रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टर, नर्सेसनी तिच्या उपचाराकडे अक्षम्य दुर्लक्ष केले. आणि क्षुल्लक उपचारासाठी दाखल झालेली माझी आई आता कायमची आम्हाला सोडून गेली, असा आकांत ललिताबाई चव्हाण यांच्या नातेवाईकांनी केला.

डोंबिवलीत राहणाऱया ललिताबाई चव्हाण (42) या टाटा पॉवर लाईन येथील महात्मा नगरात राहतात. उलटी, जुलाबाचा त्रास सुरू झाला म्हणून त्यांना डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दाखल केले. तिथून त्यांना कळवा रुग्णालयात पाठवण्यात आले. ललिताबाई एका कंपनीत साफसफाईचे काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. उलटी, जुलाब सुरू झाल्याने त्यांना कळवा रुग्णालयात दाखल केले आणि अवघ्या चार दिवसांत त्यांची प्रकृती खालावली. त्यांना आयसीयूची गरज असतानाही तिथे दाखल करण्यात डॉक्टरांनीं टाळाटाळ केली आणि अगदी शेवटच्या क्षणी आयसीयूमध्ये हलवण्याचा फार्स केला. वेळीच योग्य उपचार मिळाले असते तर माझी आई वाचली असती असा आरोप ललिताबाईंची मुले अभिषेक आणि अक्षय यांनी केला.

नीट उपचार मिळाले असते तर आमची माही वाचली असती

कळवा रुग्णालयात आज मृत्यू झालेल्यांत उल्हासनगरमधून उपचारासाठी आणलेल्या माही दास या एक वर्षाच्या बालिकेचा समावेश आहे. उलटी झाल्याने तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते, मात्र आज सकाळी तिचा मृत्यू झाला. नीट उपचार मिळाले असते तर आमची लाडकी माही वाचली असती. ती गेली हो… असा टाहो तिच्या आई-वडिलांनी पह्डला. माहीच्या उपचाराकडे नीट लक्ष दिले गेले नाही. डॉक्टरांनी नीट उपाययोजना केली नाही म्हणूनच आमच्या माहीचा बळी गेला, असा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला. चिमुकल्या माहीचा पांढऱया कपडय़ात गुंडाळलेला मृतदेह रुग्णालय प्रशासनाने तिच्या आई-वडिलांच्या ताब्यात दिला. ते दृश्य पाहून सगळेच जण हेलावून गेले होते.