ललित पाटीलला ताब्यात घेण्याचा पुणे पोलिसांचा मार्ग मोकळा

ड्रग्ज प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील याला ताब्यात घेण्यासाठीची न्यायालयीन प्रक्रिया पुणे पोलिसांनी पूर्ण केली असून न्यायालयातून प्रॉडक्शन वॉरंट मिळवले आहे. त्यामुळे त्याला अटक करण्यासाठीचा पुणे पोलिसांचा मार्ग मोकळा झाला आहे. उद्या (दि. 1) पुणे पोलीस ललितला ताब्यात घेऊन पुणे जिल्हा न्यायालयात हजर करण्याची शक्यता आहे.

ड्रग्ज प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असून दररोज नव नवे धागेदोरे या प्रकरणात उघडकीस येत आहेत. ललितने ससून रुग्णालयातून पलायन केल्यानंतर पोलीस आणि ससून रुग्णालयातील कार्यपद्धतीवर टीका करण्यात येत आहे. या प्रकरणात ललित पाटील याला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पोलीस कोठडीची मुदत संपल्यानंतर सोमवारी ललितला पुन्हा अंधेरी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.