यू-डायस प्रणालीत माहिती न भरणाऱया शिक्षकांचे पगार रोखणार, शिक्षण विभागाचे आदेश

शालेय शिक्षण विभागाने शाळा, विद्यार्थी, शिक्षक आदींच्या संदर्भात वेळोवेळी यू-डायस प्लस प्रणालीमधे माहिती भरण्यासाठी आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱया कामचुकार शिक्षकांवर आता वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे. यासाठी आज महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी आदेश जारी केले आहेत.

डांगे यांच्या आदेशानुसार उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या आहेत. ज्या शिक्षकांनी प्रामाणिकपणे यू-डायस प्लस प्रणालीमध्ये माहिती भरलेली आहे, त्यांचा गौरव व्हावा, अशा भावना शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत, तर ज्यांना ही माहिती भरता आली नाही, त्यासाठी नेमक्या तांत्रिक अडचणी शिक्षण विभागाने लक्षात घ्याव्यात आणि त्यानंतर वेतन कपात आदी प्रकारची कारवाई करण्यासाठी पावले उचलावीत, अशा प्रतिक्रिया शिक्षकांनी व्यक्त केल्या आहेत.

यू-डायस प्लसमध्ये विविध प्रकारची माहिती भरण्यात आली नसल्याने राज्य व पेंद्र शासनास सन 2024-25 व सन 2025-26 समग्र शिक्षा, स्टार्स व पीएमश्री योजनांचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक सादर करण्यासाठी मोठी दिरंगाई होत असल्याने केंद्राकडून यासाठी मिळणारा निधी रोखला जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे अखेरचा पर्याय म्हणून ज्या शिक्षक आणि शाळांकडून यू-डायस प्लस प्रणालीमध्ये शाळा, विद्यार्थी व शिक्षक यांची सर्व माहिती भरण्यासाठी दिरंगाई केली, त्यांच्यावर थेट वेतन कपात आदी कारवाई केली जाणार असल्याचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी म्हटले आहे.

– तर त्यात, 76.27 टक्के शाळांमधील शिक्षकांची माहिती अंतिम केलेली आहे आणि त्यानंतर 71.70 टक्के विद्यार्थ्यांची माहिती अंतिम केलेली आहे. तर 29 टक्के विद्यार्थ्यांची माहिती अद्यापही नोंदविण्यात आली नाही.
– राज्यातील एकूण सरकारी, अनुदानित आदी शाळांमध्ये 25 हजार 788 शाळांनी शिक्षकांची अद्यापपर्यंत माहिती भरली नाही.
– यू-डायस प्लस प्रणालीमधील अहवालानुसार 88.08 टक्के शाळांची भौतिक माहिती अद्ययावत केलेली आहे.
– तर 12 हजार 947 शाळांनी भौतिक माहिती भरणेकरिता चालढकलपणा केला आहे.

यू-डायस प्लस प्रणालीमधे माहिती भरण्यासाठी वेळोवेळी आदेश देऊनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱया कामचुकार शिक्षकांवर आता त्यांचे वेतन कापण्याची कारवाई केली जाणार आहे. मात्र या कारवाईचा फटका प्रामाणिक शिक्षकांना बसणार नाही, याची काळजी घेण्याची मागणी होत आहे.