मुंबईच्या सीमेवर दुधाची ‘नाकेबंदी’, परराज्य व जिल्ह्यातून येणाऱ्या दुधाची जागेवरच तपासणी

सणासुदीचे दिवस आल्याने खवा, मावा, मिठाईला होणारी जोरदार मागणी लक्षात घेता अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) त्याची वेळीच दखल घेतली आहे. परराज्य व जिह्यातून शहरात येणारे दूध उत्तम दर्जाचे आणि भेसळ केलेले नसावे याकरिता एफडीएने गुरुवारी रात्री मुंबईच्या टोल नाक्यांवर विशेष मोहीम राबवत शहरात येणाऱ्या दुधाची कसून तपासणी केली.

सणासुदीच्या काळात दुधाची मागणी वाढत असल्याने त्यात भेसळ होण्याची, अन्न पदार्थाचा दर्जा व गुणवत्ता घसरण्याची शक्यता दाट असते. त्यामुळे मुंबईकरांना शुद्ध दूधच मिळावे याकरिता एफडीएने शहराच्या सीमेवरच दूध तपासण्याची मोहीम राबवली. दहिसर, मानखुर्द (वाशी), ऐरोली, मुलुंड टोलनाका पूर्व, मुलुंड टोलनाका एल.बी.एस. या पाचही ठिकाणी परराज्य व परजिल्हय़ातून येणाऱ्या वाहनातील प्रत्येक दुधाची तपासणी शासकीय विश्लेषकांच्या मार्फत करण्यात आली. या वेळी सात लाख 26 हजार 43 लिटर दुधाच्या साठय़ाचे 346 नमुने घेण्यात आले. तपासणी केलेल्या दुधाच्या साठय़ापैकी एकूण 23 लिटर साठा हा नष्ट करण्यात आला, तर 1900 लिटर साठा हा परत करण्यात आला. गुरुवारी रात्री एफडीएने ही धडक मोहीम राबवल्याने भेसळ केलेले दूध मुंबई आणू पाहणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

पण शहरात होणाऱ्या भेसळीचे काय?

मुंबईकरांना भेसळ केलेले दूध मिळू नये याकरिता एफडीने विशेष मोहीम राबवली. पण शहरात काही मिठाईवाले, दूध विक्रेते भेस करतात त्याचे काय? सणासुदीच्या दिवसात उत्तम दर्जाची मिठाई अथवा दुग्धजन्य पदार्थच उपलब्ध होतील यासाठी एफडीएकडून विशेष काळजी घेतली जाणार का, असा सवाल नागरिकांमधून होत आहे.