मराठा आरक्षण सर्वेक्षणाचे काम सक्तीचे केले; प्राथमिक शिक्षकांचे काळी फीत आंदोलन

मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील नागरिकांचे सर्वेक्षण करण्यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यवेक्षक व प्रगणक आदेश व्हॉटसॲप द्वारे शिक्षकांना देण्यात आले आहेत. संबंधित आदेश हे अचानक देत तातडीने प्रशिक्षणासाठी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. मागासवर्गीय आयोग, जिल्हाधिकारी यांच्या पत्राचा संदर्भ देत हे तातडीचे आदेश सर्व तालुक्यातील तहसीलदार यांनी काढले आहेत. नेहमीप्रमाणे या अशैक्षणिक व तातडीच्या कामासाठी बहुसंख्येने प्राथमिक शिक्षक यांनाच आदेश देण्यात आले आहेत. यामुळे प्राथमिक शिक्षकांमध्ये तीव्र नाराजीचा सूर दिसून येत आहे. यामुळे हे प्रशिक्षण घेताना व काम करताना काळी फीत लावून काम करण्याचा निर्णय प्राथमिक शिक्षक सहकार समन्वय समिती मार्फत घेतला आहे. शिक्षकांनी निषेधाचे निवेदन जिल्हाधिकारी रत्नागिरी, मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी रत्नागिरी व सर्व तालुक्यातील तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

शैक्षणिक वर्ष 2023-24 च्या सुरुवाती पासूनच अनेक उपक्रमांचा भडीमार शिक्षकांवर केला जात आहे. त्यामुळे अध्ययन अध्यापनाचे मूळ मुख्य काम बाजूला पडत आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर दिसून येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात जवळपास 25 टक्के इतकी प्राथमिक शिक्षक रिक्तपदे आहेत. याचा विचार न करता सातत्याने येणारे विविध उपक्रम व त्याची ऑफलाईन माहिती तयार करून पुन्हा ऑनलाइन करणे, या सांख्यिकी माहीती देण्यातच तसेच त्यांचे अहवाल ठेवणे व सादर करणे यामध्ये प्रचंड वेळ वाया जात आहे. रात्री, अपरात्री येणारे मेसेज, आदेश व तात्काळ मागितली जाणारी माहिती यामुळे शिक्षकांवरील ताण तणाव वाढत आहे.

गेल्या वर्षभरात यामुळे शिक्षकांचे स्वास्थ्य बिघडले आहे. अनेक शिक्षक ताणतणावामुळे अचानकपणे मृत्यू पावले. तर काहींना गंभीर आजार जडले आहेत. दिवसेंदिवस हा ताणतणाव वाढत्या अशैक्षणिक कामामुळे वाढतच आहे. बीएलओ, नवभारत साक्षरता अभियान आदी कामे शिक्षकांना कारवाईचा बडगा दाखवून करून घेतली जात आहेत. या कामाने त्रस्त शिक्षकांना स्वेच्छा निवृत्ती देखील मिळत नाही, अशी स्थिती आहे.

सद्यस्थितीत आज पासून होऊ घातलेले प्रशिक्षण व त्यातील करावयाचे सर्वेक्षण पाहता हे काम करणे शिक्षकांना अशक्य आहे. तरीही कारवाईचा बडगा दाखवून करून घेण्याची शासनाची मानसिकता व तयारी झाली आहे. यामुळे शिक्षक चिंताग्रस्त झाले आहेत. त्यासाठी प्रशिक्षणसाठी उपस्थित राहताना काळी फित लावून आपण सनदशीर मार्गाने आपला निषेध नोंदवण्या शिवाय पर्याय राहिला नाही. त्यामुळे काळी फित लावण्याचा निर्णय घेण्यात येत आहे.

या सर्वेक्षण काळात शिक्षकांना मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा, निपुण भारत अंतर्गत दरमहाच्या चाचण्या, प्रजासत्ताक दिन व त्या अनुषंगाने विद्यार्थी विविध गुणदर्शन कार्यक्रम, शालेय क्रीडास्पर्धा, शिष्यवृत्ती व विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा इत्यादी उपक्रम राबवायचे आहेत. तरी मराठा आरक्षण सर्वेक्षण व इतर विविध अशैक्षणिक कामांबाबतीत फेरविचार करावा. शिक्षकाकडून ही कामे काढून घ्यावीत, अशी विनंती करण्यात येत आहे. अन्यथा सनदशीर मार्गाने तीव्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा प्राथमिक शिक्षक सहकार समन्वय समिती मार्फत देण्यात आला आहे.