व्यावसायिकाचे वाचवले 35 लाख रुपये 

पोलीस आणि आयकर अधिकारी असल्याचे भासवत व्यावसायिकाकडून पैसे उकळू पाहणाऱया ठगाना सायबर पोलिसांनी चांगलाच दणका दिला. पोलिसांनी वेळीच कारवाई करून व्यावसायिकाचे 35 लाख 12 हजार रुपये वाचवले आहे. सायबर पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. तक्रारदार हे व्यावसायिक असून दक्षिण मुंबईत राहतात. गेल्या आठवडयात त्याना एका नंबरवरून फोन आला. ठगाने स्वतःला पोलीस अधिकारी आणि आयकर अधिकारी असल्याचे भासवले. तुमच्या नावाचे फेडेक्स कुरिअर आले आहे. बँक खात्यात संशयास्पद व्यवहार झाला आहे. त्यामुळे तुमच्यावर कारवाई होऊ शकते. जर कारवाई रोखायची असल्यास दिलेल्या खात्यात पैसे जमा करण्यास सांगितले. कारवाईच्या भीतीने व्यावसायिकाने 35 लाख 12 हजार रुपये जमा केले. पैसे जमा केल्यावर त्याने याची माहिती एकाला दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्याने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांनी अधिकायांना तपासाच्या सूचना दिल्या. प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण याच्या पथकातील उप निरीक्षक मंगेश भोर, किरण पाटील आदीच्या पथकाने तपास सुरु केला. ज्या खात्यात फसवणुकीचे पैसे जमा झाले होते, त्याची माहिती काढली. पोलिसांनी संबंधित बँकेच्या नोडल अधिकायांना संपर्क केला. बँकेने फसवणूक झालेली रक्कम गोठवली.