आम्हीच मूळ पक्ष, फुटला तो गट! शरद पवार यांच्या वतीने वकिलांचा जोरदार युक्तिवाद

राष्ट्रवादीमधील बंडळीनंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष हे नाव आणि घडय़ाळ या निवडणूक चिन्हासाठी लढाई सुरू झाली आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आजपासून सुनावणी सुरू झाली. यावेळी अजित पवार गटाकडून ज्येष्ठ विधिज्ञ मनिंदर सिंग यांनी पक्षाचे सर्वाधिक आमदार व पदाधिकारी सोबत असल्याचा दावा करत राष्ट्रवादी हे नाव आणि निवडणूक चिन्ह अजित पवार गटाला देण्याची मागणी केली. दरम्यान, शरद पवार यांच्याकडून युक्तिवाद करताना ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनू सिंघवी यांनी मूळ राष्ट्रवादी  कॉँग्रेस पक्ष आमच्याकडेच आहे, केवळ एक गट पक्षातून बाहेर गेला. यावरून पक्षात फूट पडली असा निष्कर्ष काढता येणार नाही, असे ठणकावून सांगितले. तसेच या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादीचे घडय़ाळ हे पक्ष चिन्ह गोठविण्यात येऊ नये, अशी मागणी केली. सोमवार 9 ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगापुढे पुन्हा सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमधून फुटून मिंधे सरकारमध्ये सहभागी झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपणच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहोत. त्यामुळे राष्ट्रवादी कॉँग्रेस हे नाव आणि घडय़ाळ हे पक्ष चिन्ह आपल्याला मिळावे, अशी मागणी करणारी याचिका निवडणूक आयागकडे सादर केली आहे. त्यावरून राष्ट्रवादीत फुट पडल्याचा निष्कर्ष काढत निवडणूक आयोगाने शरद पवार यांच्या नेतृत्वातील पक्ष तसेच अजित पवार गटाला सुनावणीसाठी नोटीस पाठवली आहे. त्यानुसार दोन्ही बाजुच्या वकीलांनी यासंदर्भात कागदपत्रे आयोगाकडे सादर करत सुनावणीस हजेरी लावली. आजच्या सुनावणीत अजित पवार गटाचे वकील मनिंदर सिंग यांनी बाजू मांडली. अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार यांची भूमिका ही पक्षविरोधी असून त्यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून शरद पवार यांनी घेतलेले निर्णय डावलल्याचे. तसेच अजित पवार गटाने सादर केलेली कागदपत्रात त्रुटी असून ते निवडणूक आयोगाची फसवणूक करत असल्याचे निदर्शनास आणून दिले.

अपात्रतेसाठी निर्देश द्या; सर्वोच्च न्यायालयात याचिका

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार यांच्या नेतृत्वात राज्यातील सत्तेत सहभागी झालेल्या आमदांची भूमिका ही पक्ष विरोधी आहे. त्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना तसे निर्देश द्यावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयात केली आहे. यावर 9 ऑक्टोबरला सुनावणी होऊ शकते.

जयंत पाटील यांची नियुक्ती बेकायदेशीर

राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष पदावर जयंत पाटील यांची करण्यात आलेली नियुक्ती ही बेकायदेशीर आहे. त्यामुळे त्यांनी आमच्या सोबतच्या 9 आमदारांवर कारवाई करण्याची केलेली मागणी चुकीची आहे. शरद पवार यांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर झालेली नियुक्ती लोकशाहीला धरून नाही. ते आपल्या मर्जीनुसार पक्ष चालवतात असा युक्तीवाद अजित पवार गटाने निवडणूक आयोगापुढील सुनावणीत केला.दरम्यान राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी माझी नियुक्ती जर बेकायदेशीर असेल तर माझ्या सहीच्या एबी फॉर्मकर निकडून आलेले आमदार बेकायदेशीर ठरणार का? असा प्रतिसवाल अजित पकार गटाला केला आहे.

अजित पवार गटाकडून  मृत व्यक्तींची कागदपत्रे

‘मृत व्यक्तींची कागदपत्रे अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगासमोर सादर करण्यात आली. खोटी कागदपत्रे सादर करून अजित पवार गटाकडून पक्षावर दावा करण्यात येत आहे. आम्ही आमची बाजू निवडणूक आयोगासमोर मांडली आहे. राष्ट्रवादी पक्षाचा चेहरा शरद पवारच आहेत,’ असे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी सांगितलं.सुनावणीला शरद पवार उपस्थित होते. अजित पवार गटाकडून मात्र वकिलांखेरीज कोणीही आले नाही.

अभिषेक मनू सिंघवी यांचा युक्तिवाद

  • राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाची स्थापनाच शरद पवार यांनी केली. राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सर्वाधिकार त्यांच्याकडे असल्याने अजित पवार पक्षावर दावा करू शकत नाहीत.
  • महाराष्ट्र विधिमंडळात अनिल पाटील यांची राष्ट्रवादीच्या मुख्य प्रतोद पदावर नियुक्ती आम्ही केली आहे.
  • घडय़ाळ पक्ष चिन्ह गोठवू नका, निर्णय होईपर्यंत पक्षाचे चिन्ह आमच्याकडेच ठेवा.
  • राष्ट्रवादीत वाद ही निवडणूक आयोगाची संकल्पना, पक्षात वाद आहे हे आयोगाने कसे ठरवले. आमची बाजू न ऐकताच निर्णय दिला.
  • राष्ट्रवादी कॉँग्रेसचे 99 टक्के कार्यकर्ते शरद पवारांसोबत, 24 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांचा शरद पकारांना पाठिंबा.
  • आमदारांच्या संख्येने काही ठरत नाही.

मनिंदर सिंग काय म्हणाले…

  •  राष्ट्रवादी कॉँग्रेसचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द झाल्याने आमदार व खासदार पक्षावरील दाव्यासाठी महत्वाचे.
  •  महाराष्ट्र किधानसभेचे 42 आणि विधानपरिषदे 6 आमदार आमच्याकडे. नागालँडमधील राष्ट्रवादी कॉँग्रेसचे सर्व 7 आमदार आमच्यासोबत.
  •  लोकसभेतील 5 आणि राज्यसभेतील 4 पैकी प्रत्येकी एक खासदार आमच्याकडे.
  •  महाराष्ट्र विधिमंडळातील पक्षाचे मुख्य प्रतोद अनिल पाटील आमच्याबरोबर.
  •  देशातील 12 राज्यांतील राष्ट्रवादीचे बहुतेक पदाधिकारी व पक्षाच्या कोअर कमिटीतील सदस्यही आमच्याबरोबर.
  •  राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षात अनेक कर्षांपासून पक्षांतर्गत निकडणुका झाल्या नाहीत.
  •  शिंदे गटाला संख्याबळ जास्त असल्याने पक्षाचे नाव आणि चिन्ह मिळाले तसेच आम्हाला द्या.