भाजपकडून सर्वाधिक रोख्यांचा वापर 2019च्या लोकसभा निवडणूक काळात; सत्ताप्राप्तीसाठी सतराशे कोटींचे रोखे केले खर्च

निवडणूक आयोगाने दिलेल्या निवडणूक रोख्यांच्या तपशीलामागील दुवे जोडण्याचा प्रयत्न केला तर गेल्या पाच वर्षांत वटवल्या गेलेल्या 12,769 कोटी रुपयांच्या निवडणूक रोख्यांपैकी जवळपास निम्मे रोखे सत्ताधारी भाजपला मिळाले असून त्यापैकी किमान साडेसतराशे कोटींचे रोखे भाजपने 2019च्या लोकसभा निवडणूक काळात वटवले असल्याचे दिसून येते, असे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.

2019ची निवडणूक आणि वटवलेले रोखे

भाजपने एप्रिल 2019मध्ये 1,056.86 कोटी रुपये आणि मेमध्ये 714.71 कोटी रुपयांचे रोखे वटवून काढून घेतले होते. नोव्हेंबर 2023मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकांदरम्यान, ऑक्टोबरमध्ये 359.05 कोटी रुपये आणि नंतर 702 कोटी रुपये वटवण्यात आले. भाजपने या सगळय़ा कालावधीत 8,633 निवडणूक रोखे वटवले. फेब्रुवारी 2020 (रु. 3 कोटी), जानेवारी 2021 (रु. 1.50 कोटी) आणि डिसेंबर 2023मध्ये (रु. 1.30 कोटी) असेही रोखे भाजपकडून वटवले गेले आहेत.

विधानसभा निवडणुकांतही रोख्यांचा उपयोग

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, मणिपूर आणि गोवा विधानसभेच्या निवडणुका सुरू असताना जानेवारी 2022मध्येही 662.20 कोटी रुपयांचे रोखे वटवले गेले. नोव्हेंबर 2022मध्ये, गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकांना सामोरे जात असतानाही रोखे वटवले गेले होते. या वर्षी जानेवारीमध्ये, काँग्रेसने 35.9 कोटींचे रोखे वटवले, तर भाजपने त्याच कालावधीत 202 कोटींचे रोखे वटवले.