स्वस्तात घराचे आमिष दाखवून बनवाबनवी…

नवी मुंबईत स्वस्तात घर मिळवून देतो दाखवून एका नागरिकाला दहा लाखांचा चुना लावणाऱया आरोपीला  कुलाबा पोलिसांनी अखेर बेडय़ा ठोकल्या. ठाण्याच्या बाळकुम येथून मनोज तांडेल याला पकडण्यात आले.

संजय देसले यांना घर घ्यायचे असल्याने ते एक चांगला प्रशस्त फ्लॅट शोधत होते. तेव्हा ते एका ओळखीच्या व्यक्तीच्या माध्यमातून शिवसाई एंटरप्रायजेसचा मनोज तांडेल याच्या संपका&त आले. नवी मुंबईतल्या करावे गावातील जय मल्हार अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट विक्रीसाठी आहेत. त्यापैकी कोणताही एक फ्लॅट तुम्हाला दहा लाखांत देतो असे तांडेलने सांगितले. हा सौदा पटल्याने देसले यांनी दोन टप्प्यात तांडेलला दहा लाख रुपये दिले. मात्र पैसे मिळाल्यानंतर मनोज तांडेलने देसले यांना घराचा ताबा देण्याकरिता टाळण्यास सुरुवात केली. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच देसले यांनी कुलाबा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.