कुलदीप, अश्विनने घेतली साहेबांची ‘फिरकी’, इंग्लंडचा अडीच दिवसातच खेळ खल्लास!

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील युवा पिढीच्या टीम इंडियाने बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखालील रथी-महारथी खेळाडूंनी सजलेल्या इंग्लंडचा पाचव्या व अखेरच्या कसोटी क्रिकेट सामन्यात अडीच दिवसांतच खेळ खल्लास केला. हिंदुस्थानने एक डाव व 64 धावांनी ही कसोटी जिंकून पाच सामन्यांची मालिका 4-1 फरकाने जिंकली.

सलामीच्या कसोटीतील पराभवानंतर हिंदुस्थानने विजयाचा चौकार ठोकून ही कसोटी मालिका गाजविली. कुलदीप यादव व रविचंद्रन अश्विन या फिरकी जोडगोळीने साहेबांची चांगलीच फिरकी घेतली. रोहित शर्मा व शुभमन गिल यांची दणकेबाज शतके आणि फिरकीपटूंची भन्नाट गोलंदाजी ही हिंदुस्थानच्या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली.

तब्बल पाच खेळाडूंचे पदार्पण झालेल्या कसोटी क्रिकेट मालिकेत यजमान हिंदुस्थानने पाहुण्या इंग्लंडचा पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत 4-1 फरकाने पराभव केला. टीम इंडियाच्या युवा पिढीने विजयाचा चौकार ठोकून ही मालिकाविजय साजरा केला. 112 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानने पहिली कसोटी गमाविल्यानंतर सलग चार विजय मिळवून मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. कुलदीप यादव व शंभरावी कसोटी खेळणारा रविचंद्रन अश्विन यांच्या फिरकीपुढे इंग्लंडने सपशेल शरणागती पत्करल्याने हिंदुस्थानने पाचव्या व अखेरच्या कसोटी सामन्यात एक डाव 64 धावांनी बाजी मारली. अष्टपैलू कामगिरी करणारा कुलदीप यादव या विजयाचा शिल्पकार ठरला, तर सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर यशस्वी जैस्वालने ‘मालिकावीरा’चा बहुमान पटकाविला.

धर्मशाळा कसोटीत नाणेफेकीचा काwल जिंकून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडचा पहिला डाव 218 धावसंख्येवरच आटोपला. कुलदीप यादवने 5, तर शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनने 4 बळी टिपत पहिला डाव गाजविला. प्रत्युत्तरादाखल हिंदुस्थानने 477 धावसंख्या उभारून पहिल्या डावात 259 धावांची मोठी आघाडी घेतली. हिंदुस्थानने दिलेले आव्हान इंग्लंडला पूर्ण करता आले नाही.

टीम इंडियाचा भीमपराक्रम

पहिली कसोटी गमाविल्यानंतर सलग चार कसोटी जिंकून मालिका 4-1 फरकाने जिंकण्याचा भीमपराक्रम हिंदुस्थानी संघाने केला. क्रिकेटच्या इतिहासात तब्बल 112 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अशी घटना घडली. हिंदुस्थानच्या आधी कसोटीत अशी कामगिरी ऑस्ट्रेलियाने 1897-98 साली आणि 1901-02 साली इंग्लंडविरुद्ध केली होती. तर इंग्लंडने 1911-12 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. आज हिंदुस्थानने या दुर्मिळ यशाची पुनरावृत्ती केली.

अश्विनपुढे शरणागती

इंग्लंडच्या दुसऱ्या डावाची सुरुवात अतिशय खराब झाली. रविचंद्रन अश्विनने दुसऱ्याच षटकात बेन डकेटचा (2) त्रिफळा उडवून हिंदुस्थानला सनसनाटी सुरुवात करून दिली. त्यानंतर जॅक क्रॉऊलीला भोपळाही पह्डता आला नाही. अश्विननेच त्याला सहाव्या षटकांत सर्फराजकरवी झेलबाद करून इंग्लंडला दुसरा धक्का दिला. मग अश्विनने ऑली पोपला (19) जैस्वालकरवी झेलबाद करून इंग्लंडची 9.2 षटकांत 3 बाद 36 अशी दुर्दशा केली.