पुनरागमनाचा निर्धार! हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात दुसरी कसोटी आजपासून

जे हैदराबादमध्ये घडलं ते विशाखापट्टणमला टाळण्यासाठी हिंदुस्थान संघाने जंग जंग पछाडले आहे. हैदराबादमध्ये पहिले तीन दिवस वर्चस्व गाजवूनही यजमान टीम इंडियाला पराभवाची नामुष्की पत्करावी लागली. त्यामुळे पाहुण्या इंग्लंडला दुसऱया कसोटीत धोबीपछाड देऊन पाच सामन्यांच्या मालिकेत पुनरागमन करण्याचा निर्धार रोहित शर्माच्या सेनेने केला आहे. इंग्लंडने पहिल्या कसोटीत जबरदस्त पुनरागमन करीत 28 धावांनी बाजी मारलेली आहे. त्यामुळे या विजयाने हुरूप वाढलेल्या इंग्लंड संघावर विजय मिळविण्यासाठी टीम इंडियाची नेमकी रणनिती काय असेल ते मैदानावर उतरणार हे बघावे लागेल.

हिंदुस्थानला दुखापतीचे ग्रहण

लोकेश राहुल व रवींद्र जाडेजा या अनुभवी खेळाडूंना पहिल्या कसोटीत दुखापत झाल्याने टीम इंडियाला मोठा धक्का बसलाय. विराट कोहली वैयक्तिक कारणामुळे पहिल्या दोन कसोटींसाठी उपलब्ध नाहीये. पहिल्या कसोटीदरम्यान के. एल. राहुल आणि रवींद्र जाडेजा दुखापतग्रस्त झाल्याने सरफराझ खान, वॉशिंग्टन सुंदर आणि सौरभ कुमार यांचा संघात समावेश करण्यात आला. जाडेजाच्या जागी कुलदीप यादवला संधी मिळण्याची शक्यता आहे. राहुलच्या जागी सरफराझ खेळणार का रजत पाटीदार? याबद्दलची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. हिंदुस्थानी संघ चार फिरकी गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता असून नवव्या क्रमांकापर्यंत खोलवर फलंदाजी असल्याने हिंदुस्थानला फलंदाजी क्रमवारीत बदल करण्याची संधीही असेल.

इंग्लंडने केला फिरकीचा अभ्यास

हिंदुस्थानी खेळपट्टय़ा फिरकीधार्जिण्या असल्याने इंग्लंडचा संघ फिरकी गोलंदाजीचा व्यवस्थित अभ्यास करून हिंदुस्थानच्या दौऱयावर आला होता. पहिल्या कसोटीत त्यांनीच हिंदुस्थानची फिरकी घेत पहिल्या कसोटीत बाजी मारली. ओली पोपने दुसऱया डावात स्वीप व रिवर्स स्वीपचा वापर करीत हिंदुस्थानी फिरकीचा समर्थपणे सामना करत 196 धावांची मॅरेथॉन खेळी केली होती. मात्र यावेळी रविचंद्रन अश्विन व वॉशिंग्टन सुंदर यांच्या जोडीला ‘चायनामन’ कुलदीप यादव असल्याने हिंदुस्थानच्या या फिरकीच्या त्रिकुटापुढे इंग्लंडच्या फलंदाजांची खरी ‘कसोटी’ लागणार आहे.

इंग्लंडच्या संघात दोन बदल

इंग्लंडने दुसऱया कसोटी सामन्याच्या पूर्वसंध्येला आपल्या संघाची घोषणा केली. विशाखापट्टणमच्या विझॅक स्टेडियमवर होणाऱया या सामन्यासाठी इंग्लंडने आपल्या संघात दोन बदल केले आहेत. दुखापतग्रस्त जॅक लीचच्या ऐवजी इंग्लंडचा युवा फिरकीपटू शोएब बशीरचा समावेश केला आहे. तो व्हिसा प्रक्रियेत गोंधळ झाल्याने पहिल्या कसोटीपूर्वी हिंदुस्थानात येऊ शकला नव्हता. इंग्लंडने आपल्या संघात अजून एक बदल केला असून पहिल्या कसोटीतील एकमेव वेगवान गोलंदाज मार्क वूडच्या ऐवजी अनुभवी वेगवान गोलंदाज जेम्स अॅण्डरसनचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश केला आहे. इंग्लंडने तीन फिरकीपटूंसोबत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जेम्स अॅण्डरसन हा हिंदुस्थानात आपली 14 वी कसोटी खेळणार आहे. पहिल्या कसोटीत इंग्लंडने मार्क वूड हा एकमेव वेगवान गोलंदाज खेळवला होता, मात्र दुसर्या कसोटीत बेन स्टोक्स हा गोलंदाजी करणार आहे. त्यामुळे इंग्लंडकडे आता पाच गोलंदाज असतील.
संभाव्य अंतिम संघ

हिंदुस्थान ः रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैसवाल, श्रेयस अय्यर, के. एस. भरत (यष्टिरक्षक), सरफराज खान/रजत पाटीदार, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह,
वॉशिंग्टन सुंदर,

इंग्लंडचा अंतिम संघ ः झॅक क्राऊली, बेन डकेट, ओली पोप, जो रूट, जॉनी बेअरस्टो (यष्टिरक्षक), बेन स्टोक्स (कर्णधार), बेन पह्क्स, रेहान अहमद, टॉम हार्टली, शोएब बशीर, जेम्स अॅण्डरसन.