‘राफेल’वर स्वदेशी बनावटीची ‘अस्त्र‘प्रणाली बसवणार, हिंदुस्थानी हवाई दलाची ‘द सॉल्ट’ला सूचना

राफेल लढाऊ विमानांमध्ये भारतीय बनावटीचे अस्त्र हे हवेतून हवेत लक्ष्यभेद करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा, लांब पल्ल्यावर मारा करणारे बॉम्ब आणि स्मार्ट ऍण्टीएअरफिल्ड यंत्रणा अंतर्भूत करण्यात यावी, असे हिंदुस्थानी हवाई दलाने सॉल्ट एव्हीएशन कंपनीला सांगितले आहे.

जागतिक स्तरावर प्रसिद्ध असलेल्या लढाऊ विमानांवर अशी स्वदेशी बनावटीची अस्त्रास्त्र प्रणाली अंतर्भूत केली गेल्यास संरक्षण क्षेत्रातील मेक इन इंडियासाठी हे महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. हिंदुस्थानी बनावटीच्या शस्त्रास्त्रांसाठी जागतिक बाजारपेठ यामुळे खुली होऊ शकेल. आपल्याकडे राफेल लढाऊ विमाने 2020 मध्ये हवाई दलात समाविष्ट करण्यात आली असून हिंदुस्थानकडे सध्या 36 राफेल आहेत. फ्रान्स, इजिप्त, कतार यांच्याकडेही राफेल विमाने आहेत. त्याच वेळी, ग्रीस, क्रोएशिया, यूएई आणि इंडोनेशियाने राफेलसाठी मागणी नोंदवली आहे.

सुखोई आणि स्वदेशी हलक्या वजनाचे लढाऊ विमान तेजसमध्ये हिंदुस्थानी शस्त्रप्रणाली आधीच वापरली जात आहे. खासगी क्षेत्रातील कंपन्यांनीही राफेलवर बसवता येतील अशी लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रs आणि बॉम्ब बनवले आहेत, असे अधिकाऱयांनी सांगितले. आयएनएस विक्रांत आणि आयएनएस विक्रमादित्यवर राफेल-एम लढाऊ विमाने तैनात केली जाऊ शकतात. या दोन्ही विमानवाहू जहाजांवर सध्या मिग-29 लढाऊ विमाने तैनात आहेत.

अस्त्रचा पल्ला वाढवणार

अस्त्र या हवेतून हवेत लक्ष्यभेद करणाऱ्या क्षेपणास्त्राचा सध्याचा पल्ला 100 किमी आहे. अस्त्र मार्क-2 मध्ये ही श्रेणी 160 किमीपर्यंत वाढवली जाईल. आणखी सुधारित प्रकारात 300 किमीचा पल्ला असणार आहे. स्मार्ट अँटी एअरफिल्ड वेपन 100 किमी पेक्षा जास्त अंतरापर्यंतचे लक्ष्य देखील भेदू शकते. त्याची ही सुधारित प्रणाली विकसित केली जात आहे.