इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना पोटाचा कॅन्सर

इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना आदित्य एल 1 च्या लॉँचिंगच्या दिवशीच कॅन्सरचे निदान झाल्याची माहिती समोर आली आहे. खुद्द सोमनाथ यांनीच एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला. चांद्रयान 3 मोहिमेच्या प्रक्षेपणाच्या वेळेसच काही आरोग्याच्या तक्रारी जाणवत होत्या. मात्र, तोपर्यंत काय झाले आहे, याचे निदान होत नव्हते. आदित्य एल 1 च्या लॉंचिंगचा दिवस उजाडला त्या दिवशी पोटाचा कॅन्सर असल्याचे समजले, असे ते म्हणाले.

2 सप्टेंबर 2023 रोजी हिंदुस्थानची पहिली सूर्य मोहीम आदित्य एल 1 चा प्रवास सुरू झाला. त्याच दिवशी सोमनाथ नियमित तपासणीसाठी गेले होते. या तपासणीदरम्यान पोटाचा कॅन्सर असल्याचे समजले, अशी माहिती एस. सोमनाथ यांनी दिली. कॅन्सरचे निदान झाल्यानंतर चेन्नईला गेलो आणि पुढच्या तपासण्या केल्या. केमोथेरपी केली. एक शस्त्रक्रियाही करण्यात आली. मी न घाबरता उपचार सुरु केले.प्रत्यक्षात एखाद्या चमत्काराप्रमाणे बाहेर आलो. 4 दिवस रुग्णालयात काढल्यानतंर पुन्हा इस्रोचे काम हाती घेतले. पाचव्या दिवशी मला कोणत्याही वेदना होत नव्हत्या. आता मी नियमीतपणे तपासणी आणि स्कॅन करतो. माझी प्रकृती आता व्यवस्थित असून कामही सुरू आहे, असे सोमनाथ म्हणाले.