IPL 2024 : हैदराबादच्या बुलेट ट्रेनला ब्रेक लागला; बंगळुरूचा 35 धावांनी विजय

बंगळुरुने पराभवाची मालिका संपुष्टात आणली आणि हैदराबदच्या विजयी रथाला लगाम लावत हैदराबादचा 35 धावांनी पराभव केला. 207 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या हैदराबदाची तुफान लयीत असणारी सलामीची जोडी ट्रेविस हेड (3 चेंडू 1 धावा) आणि अभिषेक शर्मा (13 चेंडू 31 धावा) स्वस्तात माघारी परतली. त्यामुळेच हैदराबादची गाडी रुळावरुन घसरली. इतर कोणत्याही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शाहबाज अहमदने नाबाद 37 चेंडू 40 धावा केल्या मात्र तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. कर्णधार पॅट कमिंन्सने 15 चेंडूंमध्ये 3 षटकार आणि 1 चौकाराच्या मदतीने 31 धावांची वादळी खेली केली. मात्र ग्रीनने पॅट कमिंन्सला बाद केले. 20 षटकांच्या समाप्तीनंतर हैदराबादला 8 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 171 धावांपर्यंत मजल मारता आली. बंगळुरूकडून स्वप्निल सिंग, कर्ण शर्मा आणि ग्रीन यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर यश दयाल आणि व्हिल जॅक्स यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झालेल्या सामन्यात बंगळुरूने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सलामीला आलेल्या विराट कोहली (43 चेंडू 51 धावा) आणि ड्यु प्लेसिस (12 चेंडू 25 धावा) यांनी संघाला चांगली सुरूवात करुन दिली. मात्र त्यांच्यानंतर खऱ्या अर्थाने रजत पाटीदारची तुफान फटकेबाजी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पाटीदारने फक्त 20 चेंडूंमध्ये 5 षटकार आणि 2 चौकारांच्या जोरावर 50 धावांची धमाकेदार खेळी केली. विराट कोहली आणि रजत पाटीदारने 65 धावांची भागीदारी केली. दोघांनाही जयदेव उनाडकटने बाद केले. त्यानंतर कॅमरून ग्रीन (20 चेंडू 37 धावा) नाबाद राहिला मात्र त्याला इतर फलंदाजांची साथ मिळाली नाही.