जालन्यातील लाठीहल्ल्याचे राज्यभरात तीव्र पडसाद; रास्ता रोको, जोडे मारो आंदोलनातून आंदोलकांनी व्यक्त केला संताप

जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी या गावात पोलिसांनी मराठा समाजाच्या आंदोलकांवर केलेल्या अमानुष लाठीमाराचे तीव्र पडसाद राज्यभर उमटले आहेत. मराठा आंदोलकांवरील लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ मराठा संघटनांनी राज्यात ठिकठिकाणी आंदोलने करत शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा निषेध केला. मुंबईत दादर, लालबाग, गिरगाव येथे आंदोलन करण्यात आले. सोलापूर, सांगली, नगर, नाशिक, जळगाव, सातारा, बीड, परभणी, धाराशीव, संभाजीनगर, लातूर आदी ठिकाणी आंदोलकांनी रास्ता रोको तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पह्टोंना जोडे मारून मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याचा निषेध नोंदवला. या घटनेची जबाबदारी स्वीकारून फडणवीसांनी राजीनामा द्यावा, लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.

जालना शहरात प्रचंड तणाव
मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना येथे अंबड चौफुलीवर निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी अभूतपूर्व असा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. आंदोलकांनी घोषणाबाजी करत दगडफेक सुरू केली. रस्त्यावर उभा असलेला एक ट्रक पेटवून देण्यात आला.

धाराशीवमध्ये बंदला हिंसक वळण
आंतरवाली सराटी येथील लाठीहल्ल्याचा निषेध करण्यासाठी धाराशीवमध्ये मराठा संघटनांच्या वतीने बंद पुकारण्यात आला होता. शम्स चौक, नगर परिषद, धारासुर मर्दानी भागात दगडफेकीच्या घटना घडल्या. जिह्यात कळंब, तुळजापूर, उमरगा, लोहारा, भूम, परंडय़ातही कडकडीत बंद पाळण्यात आला.

बीडमध्ये ठिकठिकाणी रास्ता रोको
आंतरवाली सराटी येथे करण्यात आलेल्या लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या बीड बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिह्यात ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. वडवणीत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळय़ाचे दहन करण्यात आले. माजलगाव आणि परळीत तुफान दगडफेक करण्यात आली. अंबाजोगाईत दुचाकी रॅली काढून लाठीहल्ल्याचा निषेध करण्यात आला. केज, आष्टी, पाटोद्यात बंद पाळण्यात आला.

मराठवाडा संतापाने पेटून उठला
परभणीत लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला. गंगाखेड, पालम, पाथरी, ताडकळस, मानवत, सेलू, सोनपेठ, झरी आदी ठिकाणी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लातूर शहरात आंदोलकांनी टायर जाळून निषेध व्यक्त केला. नांदेड जिह्यात लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ ठिकठिकाणी आंदोलन करण्यात आले. माहूर येथे कडकडीत बंद पाळण्यात आला. पंधारही बंद होते.

सोलापूर, सांगलीत ‘जोडे मारो’ आंदोलन
सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवरायांच्या पुतळय़ाजवळ झालेल्या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह अजित पवार यांच्याही प्रतिमेला जोडे मारत त्यांच्या प्रतिमा पायाखाली तुडवत संताप व्यक्त केला. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्फूर्तिस्थळासमोर मराठा समाजाच्या वतीने निदर्शने करण्यात आली. यावेळी आंदोलकांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या प्रतीकात्मक पोस्टरला जोडे मारून आंदोलन केले.

जळगावमध्ये निषेध आंदोलन
जळगावमध्ये राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून निषेध आंदोलन करण्यात आले. शहरातील आकाशवाणी चौकात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयासमोरील महामार्गावर करण्यात आलेल्या आंदोलनात आमदार रोहित पवार हेही सहभागी झाले होते.

यवतमाळमध्ये सरकारचे पुतळे जाळले
यवतमाळमध्ये मराठा कुणबी क्रांती मोर्चाच्या वतीने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा पुतळा जाळून निषेध आंदोलन केले. बस स्थानक चौकात हे आंदोलन केले. यावेळी पोलीस आणि आंदोलक यांच्यात झटापट झाली.

लालबाग
शिवसेना शिवडी विधानसभेच्या वतीने भारतमाता सेंटर पॉइंट येथे आंदोलन करत सरकारला काळे झेंडे दाखवण्यात आले. यावेळी शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, पश्चिम महाराष्ट्र समन्वयक दगडू सकपाळ, शिवडी विधानसभा संघटक सुधीर साळवी यांच्यासह शिवसैनिक यावेळी मोठया संख्येने उपस्थित होते.

दादर
शिवसेना माहीम विधानसभेच्या वतीने दादर येथे जोरदार आंदोलन करत सरकारचा निषेध करण्यात आला. उपनेत्या विशाखा राऊत, विभागप्रमुख महेश सावंत, विभाग संघटक श्रद्धा जाधव यांच्यासह शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

दक्षिण मुंबई
शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 च्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आला. त्यावेळी शिवसेना उपनेते अरुण दुधवडकर, विभागप्रमुख संतोष शिंदे, महिला विभाग संघटिका युगधंरा साळेकर यांच्यासह शिवसैनिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते.