पंतप्रधानपदासाठी सहकारी मंत्र्याने पुन्हा पुढे केले नितीश कुमारांचे नाव

देशातील सगळ्या विरोधकांनी एकत्र येत उभ्या केलेल्या I.N.D.I.A. आघाडीची मुंबईत बैठक होणार आहे. या बैठकीत सामायिक किमान कार्यक्रम आणि आघाडीचे समन्वयक यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईत होणाऱ्या या बैठकीपूर्वी नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळातील मंत्री जामा खान यांनी, देशातील जनतेला नितीश कुमार यांना पंतप्रधान म्हणून पाहायचे आहे, असे म्हटले आहे. जामा खान यांच्या या वक्तव्यानंतर इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदासाठीचा चेहरा कोण असेल याबाबत चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. काँग्रेस नेत्यांना याबाबत विचारले असता त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की पंतप्रधानपदाची चर्चा निवडणुकीनंतर होईल, तूर्तास सगळे एकत्र मिळून केंद्रातील भाजप सरकारचा पराभव कसा करता येऊ शकतो याबाबत विचारमंथन करत आहेत.

नितीश कुमार यांनी विरोधकांना एकत्र आणण्याचा प्रयत्न सुरू केला होता तेव्हा, आपण पंतप्रधानपदाच्या शर्यतीत नसल्याचे खुद्द नितीशकुमार यांनी सांगितले होते. ही बाब त्यांनी अनेकदा सांगितली आहे. एकीकडे नितीश कुमार पंतप्रधानपदासाठी आपण इच्छुक नसल्याचे सांगत असताना त्यांच्या पक्षातील नेते आणि मंत्री मात्र त्यांचे नाव पुढे करताना दिसतात. त्यामुळे ही जनता दल युनायटेडचे दबावतंत्र असू शकते असे कयास बांधले जात आहेत. मुंबईमध्ये होणाऱ्या इंडिया आघाडीच्या बैठकीत या आघाडीचे समन्वयक कोण होणार, याबाबत चर्चा होणार आहे.

‘इंडिया’च्या बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष

सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या हुकूमशाहीविरुद्ध स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या आगामी बैठकीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे. मुंबईत येत्या 31 ऑगस्ट व 1 सप्टेंबरला सांताक्रूझच्या ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये ही बैठक होणार असून त्याची तयारी जोमात सुरू आहे. आघाडीचे नेते बैठकीच्या पूर्वतयारीवर बारीक लक्ष ठेवून आहेत. या बैठकीला देशातील 26 पक्षांचे नेते उपस्थित राहणार असल्याने भाजपलाही धडकी भरली आहे.

इंडिया आघाडीच्या हालचाली वाढल्यामुळे भाजप व अन्य सहकारी पक्षही चिंतेत पडले आहेत. ‘इंडिया’च्या मुंबईतील आगामी बैठकीमध्ये महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चेबरोबरच आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरही निर्णय घेतले जाणार आहेत. या बैठकीपूर्वी 23 ऑगस्ट रोजी महाविकास आघाडीची बैठक ग्रॅण्ड हयात हॉटेलमध्ये होणार आहे. त्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह काँग्रेस व घटक पक्षाचे नेते उपस्थित राहणार आहेत. 31 ऑगस्टपासून होणाऱया बैठकीचा सविस्तर आढावा यावेळी घेतला जाणार आहे.

यापूर्वी बिहारच्या पाटणा आणि कर्नाटकच्या बंगळुरूमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली होती. तिसरी बैठक मुंबईत होत आहे. बैठकीच्या आयोजनाची मुख्य जबाबदारी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडे आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही प्रमुख पक्ष समन्वयाने बैठकीच्या आयोजनाच्या तयारीत गुंतले आहेत. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, खासदार संजय राऊत आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी रविवारी या बैठकीच्या तयारीची माहिती घेतली होती.

पाच मुख्यमंत्र्यांसह 80 नेत्यांची उपस्थिती

‘इंडिया’ बैठकीमध्ये देशभरातील व्हीआयपींची उपस्थिती असणार आहे. देशभरातील विरोधी पक्षांमधील सुमारे 80 नेते हजर राहणार आहेत. त्यात पाच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचाही समावेश असणार आहे. महाविकास आघाडीतील पक्षांकडे बैठकीतील व्यवस्थेसंदर्भातील वेगवेगळी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.