शिवसेना आणि राष्ट्रवादी आमदार अपात्रतेप्रकरणी एकत्र सुनावणी

शिवसेनेसोबत गद्दारी करून मिंधे गटात सहभागी झालेले आमदार तसेच राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या फुटीर आमदारांच्या अपात्रते प्रकरणी एकत्र सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी महाराष्ट्र विधानसभेतील आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईसंदर्भात शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी घेण्यात येणार असल्याचे आज जाहीर केले.

राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये बंडखोरी करून अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी झालेले 9 मंत्री तसेच अजितदादा समर्थक राष्ट्रवादीच्या फुटीर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी यासाठी 2 जुलै रोजी किधानसभा अध्यक्षांकडे अपात्रतेची याचिका करण्यात आली आहे. मात्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे त्यावरील कारवाईस दिरंगाई करत आहेत. त्यांना आमदार अपात्रतेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश द्यावेत, अशी याचिका राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. ही याचिका खंडपीठापुढे सुनावणीला आली असता सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रतेचे प्रकरण या दोन्ही याचिकांवर शुक्रवार 13 ऑक्टोबर रोजी सुनावणी होईल, असे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयात आज झालेल्या सुनावणीदरम्यान  राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून ज्येष्ठ विधिज्ञ कपिल सिब्बल आणि विरोधी गटाकडून मुकुल रहोतगी यांनी बाजू मांडली.

विधानसभा अध्यक्षांना नोटीस जारी

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे आमदार अपात्रताप्रकरणी निर्णय घेण्यास वेळकाढूपणा करत असल्याने शिवसेना पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनीही अजित पवार गटाच्या आमदारांवरील अपात्रतेच्या कारवाईस अध्यक्षांकडून विलंब होत असल्याचा मुद्दा उपस्थित केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने याची गंभीर दखल घेत नार्वेकर यांना नोटीस जारी करत लवकरात लवकर उत्तर देण्याचे निर्देश दिले आहेत.

शिवसेनेच्या 16 आमदारांचे प्रकरण आणि राष्ट्रवादीच्या आमदारांवरील अपात्रतेची कारवाई ही प्रकरणे स्वतंत्र याचिकांद्वारे सर्वोच्च न्यायालयापुढे सुनावणीसाठी आली आहेत. ही दोन्ही प्रकरणे वेगवेगळी असली तरी राज्यघटनेच्या 10व्या सुचीशी संबंधित आहेत. यामुळे या दोन्ही याचिकांवर एकत्र सुनावणी घेण्यात येईल, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

अजित पवार गटाला आयोगाने फटकारले

राष्ट्रवादी कॉँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी पक्ष आणि घडय़ाळ या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. यासंदर्भात केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी सुरू असून आता पुढील सुनावणी 9 नोव्हेंबरला पार पडणार आहे. दरम्यान अजित पवार गट हा निवडणूक चुकीची आकडेवारी आणि माहिती देऊन दबाव टाकत असल्याने निवडणूक आयोगाने त्यांना फटकारले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉँग्रेसचे वकील ज्येष्ठ विधिज्ञ अभिषेक मनुसिंघवी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी कुणाची? याबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे आज दुसऱ्यांदा सुनावणी झाली यावेळी अजित पकार गटाकडून नीरज किशन कौल, मनिंदर सिंह यांनी युक्तिवाद केला. आमच्याकडे  दीड लाखाहून अधिक शपथपत्रे आहेत तर विरोधी बाजूकडे केकळ 40 हजार शपथपत्रे असल्याचा दावा करण्यात आला. याकर शरद पवार यांच्याकडून युक्तिवाद करताना अभिषेक मनू सिंघवी यांनी अजित पवार गटाने कार्यकर्त्यांची ओळख पटकून द्याकी, त्यांच्याकडे नेमके किती आमदार आहेत त्यांची संख्या आणि नावे सादर करण्याची मागणी केली. त्यावर प्रत्येकाची ओळख पटकून देणे अशक्य असल्याचे अजित पकार गटाच्या वकिलांनी सांगितले.

दरम्यान, अभिषेक मनू सिंघवी यांनी आम्हाला म्हणणे मांडण्यासाठी कमी केळ मिळालेला असतानाही आम्ही 9 हजार शपथपत्रांमध्ये त्रुटी काढलेल्या आहेत. कमी केळेत आम्ही एकढय़ा त्रुटी शोधल्या. आणखी पुराके देण्यासाठी आणि म्हणणे मांडण्यासाठी आम्हाला केळ द्या, अशी विनंती त्यांनी केली. त्यावर अजित पवार गटाच्या वकिलांनी विरोधी बाजूच्या लोकांना चारवेळा संधी देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना अधिकचा वेळ या प्रकरणात न देता निर्णय देण्यात यावा, अशी मागणी केली. मात्र, मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय निवडणूक आयोगापुढे चुकीची माहिती सादर करून निर्णयासाठी दबाव टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या अजित पवार गटाची फटकारत त्यांची मागणी फेटाळून लावली.

शरद पवार गटाला 30 ऑक्टोबरपर्यंत मुदत

शरद पवार गटाला कागदपत्र सादर करण्यास केंद्रीय निवडणूक आयोगाने 30 ऑक्टोबरपर्यंतची मुदत दिली आहे. अजित पकार गटाकडून 20 हजार प्रतिज्ञापत्रे सादर करण्यात आली आहेत. त्यापैकी 9 हजार प्रतिज्ञापत्रांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत. जर इतर प्रतिज्ञापत्रांची चौकशी केल्यास किती त्रुटी बाहेर येतील. त्यांना हे प्रकरण तातडीने मार्गी लाकायचे असल्याने ते आम्हाला कमी केळ देण्याचा प्रयत्न करत आहेत. पण निकडणूक आयोगाने त्यांचे ऐकले नाही, असं अभिषेक मनू सिंघवी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

शरद पवारांच्या वकिलांचा युक्तीवाद काय?

अजित पवार गटासोबत किती आमदार आहेत, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. अजित पवारांसोबत नेमके किती आमदार आहेत ? बहुसंख्य आमदार म्हणजे किती ? फक्त आकडा नाही तर नावं सांगा?, अशी मागणी शरद पवारांची बाजू मांडताना त्यांचे वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी केली.

फैझल पुन्हा खासदार

लक्षद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते मोहमद फैझल यांच्या दोषसिद्धीला स्थगिती देण्याची याचिका फेटाळण्याच्या केरळ उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी स्थगिती दिली. त्यामुळे फैजल यांची रद्द झालेली खासदारकी परत मिळण्याचा मार्ग  मोकळा झाला आहे. 3 ऑक्टोबर रोजी केरळ उच्च न्यायालयाने फैजल यांच्या दोषसिद्धीस स्थगिती देण्यास नकार दिल्यावर गेल्या बुधवारी लोकसभा सचिवालयाने त्यांना खासदार म्हणून अपात्र ठरवल्याचे जाहीर केले होते. या वर्षात फैजल यांना दोन वेळा अपात्र ठरवण्यात आले आहे.